File Photo
अजमेर : राजस्थानमधील अजमेर दर्गा शिवमंदिरावर बांधण्यात आला आहे. हे मंदिर भगवान श्री संकटमोचन महादेव विराजमान मंदिर म्हणून घोषित करावे, अशी मागणी न्यायालयाकडे करण्यात आली आहे. त्याचबरोबर दर्गा समितीने परिसरात केलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमण हटवण्याची मागणी अजमेर जिल्हा न्यायालयात करण्यात आली आहे.
हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी वकील शशी रंजन कुमार सिंह यांच्यामार्फत दाखल केलेल्या याचिकेवर १० ऑक्टोबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाला दर्ग्याचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही याचिकेत करण्यात आली आहे. अजमेर दर्गा हा सूफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी (मजार) आहे.
विष्णू गुप्ता यांनी दाखल केलेल्या याचिकेत दावा करण्यात आला आहे की, मुख्य प्रवेशद्वारावरील छताची रचना हिंदू वास्तूशी मिळतीजुळती आहे. यावरून हे लक्षात येते की, ही जागा मुळात मंदिर होती. या छत्रींचे साहित्य आणि शैली स्पष्टपणे त्यांचे हिंदू मूळ प्रतिबिंबित करते. त्याचे उत्कृष्ट कोरीव काम दुर्दैवाने रंग आणि पांढरेपणामुळे लपलेले आहे, जे काढून टाकल्यानंतर त्याची खरी ओळख आणि वास्तविकता समोर येईल.
अजमेर दर्गा रिकाम्या जागेवर बांधण्यात आल्याची कोणतीही नोंद नाही, असा युक्तिवादही याचिकेत करण्यात आला आहे. त्याऐवजी, ऐतिहासिक नोंदींवरून असे दिसून येते की, या ठिकाणी महादेव मंदिरे आणि जैन मंदिरे होती, जिथे हिंदू भाविक त्यांच्या देवतांची पूजा करीत असत. वादग्रस्त जागेवरील महादेव मंदिराची पुनर्बांधणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. अजमेर येथील महादेव लिंगाच्या जागी सध्याची वास्तू हटवून महादेव मंदिराची पुनर्बांधणी करण्यात यावी आणि देवतेची पूजा, भोग, विधी यांची सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दर्गा समिती आणि सरकारसाठी काम करणाऱ्यांना वरील मालमत्तेत कोणत्याही प्रकारे प्रवेश किंवा वापर करण्यापासून रोखावे, अशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. दर्गा पाडून त्या जागी मंदिर बांधण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. ज्या तळघरात ख्वाजाला दफन करण्यात आले होते, त्या तळघरात महादेवाची प्रतिमा असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. अजमेर शरीफ दर्गा हा भारतातील सर्वात पवित्र मुस्लीम दर्ग्यांपैकी एक मानला जातो.