‘नीट-यूजी’ च्या पुनर्परीक्षेत १,५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर

नवी दिल्ली: ‘नीट-यूजी’ परीक्षेतील गैरप्रकारानंतर रविवारी (दि. २३) घेण्यात आलेल्या याच्या पुनर्परीक्षेला १,५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर राहिले. केवळ ८१३ उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Mon, 24 Jun 2024
  • 02:21 pm
NEET-UG Exam

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली: ‘नीट-यूजी’ परीक्षेतील (NEET-UG Exam) गैरप्रकारानंतर रविवारी (दि. २३) घेण्यात आलेल्या याच्या पुनर्परीक्षेला १,५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर राहिले. केवळ ८१३ उमेदवारांनी ही पुनर्परीक्षा दिली.  

सीबीआयने रविवारी ‘नीट-यूजी’ परीक्षेतील गैरप्रकाराबाबत शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून पहिला एफआयआर नोंदवला. मंत्रालयाकडून मिळालेल्या काही संदर्भांच्या आधारे, अज्ञात लोकांविरुद्ध आयपीसीच्या कलम १२० ब (गुन्हेगारी कट) आणि ४२० (फसवणूक) यासह विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला.

सीबीआयने तपासासाठी दोन विशेष पथके तयार केली आहेत, जी पाटणा आणि गोध्रा येथे जाणार आहेत. केंद्र सरकारने शनिवारी (दि. २२) रात्री तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली होती. यापूर्वी, सरकारने शनिवारी रात्री ९ वाजता एनटीएचे (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना हटवले होते. त्यांच्या जागी नवे डीजी म्हणून प्रदीपसिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

‘नीट-यूजी’ परीक्षेच्या निकालात ग्रेस गुण मिळालेल्या १,५६३ उमेदवारांसाठी रविवारी पुनर्परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दुपारी दोनपासून होणार होती. १,५६३ पैकी केवळ ८१३ उमेदवार परीक्षेला बसले होते. ७५०उमेदवार परीक्षेला बसले नाहीत. चंदीगडमध्ये फक्त दोन उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले होते. ते दोघेही आले नाहीत.

इंडियन मेडिकल असोसिएशनने  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे ‘नीट-यूजी’ परीक्षेतील वादांवर कारवाई केल्याबद्दल आभार मानले आहेत.

याशिवाय ‘नीट-यूजी’ परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास सीबीआयकडे सोपवल्याबद्दल आणि एनटीएच्या महासंचालकांना हटवल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनने शिक्षण मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest