संग्रहित छायाचित्र
कल्लाकुरिची: तमिळनाडूतील कल्लाकुरिची (Kallakurichi) जिल्ह्यात रविवारी (दि. २३) विषारी दारूमुळे मृतांची संख्या ५६वर पोहोचली आहे. रविवारी जाहीर झालेल्या जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार एकूण २१६ लोकांना चार वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कल्लाकुरिची मेडिकल कॉलेजमध्ये सर्वाधिक ३१ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १०८ जणांवर उपचार सुरू आहेत. पुद्दुचेरी येथील जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमध्ये १७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तेथे तिघांचा जणांचा मृत्यू झाला आहे. विलुपुरम मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेल्या चार जणांचा मृत्यू झाला आहे. चार जणांवर उपचार सुरू आहेत. सालेम मेडिकल कॉलेजमध्ये ३० जणांवर उपचार सुरू असून येथे १८ जणांचा जीव गेला आहे. मृतांमध्ये ५१ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. (Deaths due to poisonous liquor in Tamilnadu)
भाजपचे प्रवक्ते आणि पुरीचे खासदार संबित पात्रा यांनी याप्रकरणी काॅंग्रेस आणि डीएमकेवर टीका केली. ते म्हणाले, ‘‘तमिळनाडूच्या करुणापुरम गावात विषारी दारूमुळे घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. येथे अनुसूचित जातीचे लोक जास्त प्रमाणात आहेत. ५६ हून अधिक लोकांचा यात मृत्यू झाला असून अनेकांची प्रकृती गंभीर आहे. काँग्रेस पक्ष आणि आघाडीचे नेते या प्रश्नावर गप्प का आहेत? त्यांनी याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.’’
रविवारी एमएनएम पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी कल्लाकुरिची मेडिकल कॉलेजमध्ये दुर्घटनेतील पीडितांची भेट घेतली. २० जून रोजी करुणापुरम गावात २४ जणांचे मृतदेह जाळण्यात आले होते.
कल्लाकुरिची दारूच्या दुर्घटनेवर राज्यातील भाजप कार्यकर्त्यांनी शनिवारी (दि. २२) निदर्शने केली. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे संचालक एस. रविवर्मन यांनी शनिवारी कल्लाकुरिची सरकारी रुग्णालयाला भेट दिली.
सावधगिरी म्हणून केरळमध्ये छापे
तमिळनाडू राज्यातील ही घटना लक्षात घेऊन केरळ सरकारचे उत्पादन शुल्कमंत्री एमबी राजेश यांनी शनिवारी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. त्यांनी अधिकाऱ्यांना बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीची चौकशी करण्याचे आदेश दिले. संपूर्ण राज्यात सखोल तपासणी आणि छापे टाकण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मंत्री राजेश यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व चेक पोस्ट आणि सीमावर्ती भागावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. राजेश यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ‘‘आवश्यक चेक पोस्टवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत आणि बाहेरून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांवर निगराणी ठेवली जाईल आणि संशयास्पद वाहनांची तपासणी केली जाईल.’’
केरळमधील मलप्पुरम आणि कोल्लम जिल्ह्यांतील भागात विशेष पाळत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागात यापूर्वीही बनावट दारूची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. मंत्री राजेश यांनीही जनतेकडून सहकार्याची विनंती केली आहे.
न्यायालयीन चौकशीचे आदेश, सात अटकेत
तमिळनाडू सरकारने या दुर्घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. मद्रास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती बी गोकुळदास यांच्या नेतृत्वाखाली हा तपास केला जाणार आहे. न्यायमूर्ती गोकुळदास तीन महिन्यांत अहवाल सादर करतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये आणि रुग्णालयात दाखल केलेल्यांना ५० हजार रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.
या प्रकरणाचा तपास तमिळनाडू पोलिसांच्या सीबी-सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. एसपी शांताराम यांच्या नेतृत्वाखाली हा तपास सुरू झाला आहे. कल्लाकुरिची जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे.
विषारी दारूमुळे २००८ मध्ये झाला होता १८० जणांचा मृत्यू
तमिळनाडूमध्ये यापूर्वी विषारी दारूमुळे मृत्यूच्या अनेक घटना घडल्या आहेत. मे २००८ मध्ये, तमिळनाडूमधील कृष्णगिरी आणि कर्नाटकातील कोलार या सीमावर्ती गावांमध्ये विषारी दारूमुळे सुमारे १८० लोकांचा मृत्यू झाला होता. यापैकी ६० कृष्णगिरी जिल्ह्यातील आणि उर्वरित कोलार आणि बंगळुरू येथील होते. अनेकांची दृष्टीही गेली होती.
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, २०२० मध्ये तामिळनाडूमध्ये विषारी दारूमुळे २० आणि २०२१ मध्ये ६ मृत्यू झाले. २०२३ मध्ये राज्यातील विल्लुपुरम आणि चेंगलपट्टू जिल्ह्यात विषारी दारूमुळे सुमारे २२ लोकांचा मृत्यू झाला होता.