संग्रहित छायाचित्र
श्रीनगर:जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात बुधवारी (दि. २५) ६ जिल्ह्यांतील २६ विधानसभा जागांवर मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार रात्री ९ वाजेपर्यंत या जागांवर ५६ टक्के मतदान झाले.
गेल्या निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण ४ टक्के कमी आहे.२०१४ मध्ये या जागांवर ६० टक्के मतदान झाले होते. जम्मू-काश्मीरचे मुख्य निवडणूक अधिकारी पीके पोळ यांनी सांगितले की, मतदानाच्या टक्केवारीत बदल होऊ शकतो. कारण काही मतदान केंद्रांवर सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत मतदान झाले. येथे २५.७८ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. रियासीमध्ये सर्वाधिक ७१.४८ टक्के मतदान झाले. श्रीनगरमध्ये सर्वात कमी २७.३७ टक्के मतदान झाले.
दुसऱ्या टप्प्यातील २६ जागांपैकी १५ जागा मध्य काश्मीरमधील आणि ११ जागा जम्मूमधील आहेत. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार दुसऱ्या टप्प्यात २३९ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये २३३ पुरुष आणि ६ महिला आहेत. पहिल्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी ७ जिल्ह्यांतील २४ विधानसभा जागांसाठी मतदान झाले. या कालावधीत ६१.३८ टक्के मतदान झाले.
जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा मिळावा, यासाठी रस्त्यावर उतरू : राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी जम्मू येथे सांगितले की, विधानसभा निवडणुकीनंतर केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा दिला नाही, तर इंडिया ब्लॉक संसदेत आपली पूर्ण ताकद वापरेल आणि गरज पडल्यास रस्त्यावरही उतरतील.
राहुल येथे एका सभेला संबोधित करत होते. ते म्हणाले की २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झाले तेव्हा येथील लोकांवर खूप अन्याय झाला. भारताच्या इतिहासात असे कधीही घडले नाही की आपण कोणत्याही राज्याचे राज्यत्व काढून त्याचे केंद्रशासित प्रदेशात रूपांतर केले आहे.
राहुल गांधी यांचा तीन आठवड्यातील जम्मू-काश्मीरचा हा तिसरा दौरा आहे. यापूर्वी ४ सप्टेंबर रोजी त्यांनी बनिहाल आणि डोरूला भेट दिली होती, तर २३ सप्टेंबर रोजी त्यांनी सुरनकोट आणि मध्य-शालतेंगला भेट दिली होती. जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले.