संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली: गुरुग्राम येथील एकम न्याय फाऊंडेशनने पुरुषांच्या हत्या आणि आत्महत्या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. या अहवालात २०२३ या वर्षात पत्नीच्या छळाला कंटाळून किती पतींनी आत्महत्या केली यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. शिवाय पत्नीने पतीची हत्या केल्याच्या घटना, हनी ट्रॅपमध्ये पुरुषांना अडकवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या घटनांचा अभ्यास यात केला आहे. बायकांनी छळल्यामुळे पुरुषांच्या आयुष्य संपवण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले असून पत्नी पीडितांनी जायचे कुठे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एकम न्याय फाउंडेशनच्या दीपिका नारायण भारद्वाज यांनी हा अहवाल तयार केला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा अहवाल तयार करताना ३०६ पुरुषांच्या हत्यांच्या घटनांचा अभ्यास करण्यात आला. यातील २१३ प्रकरणांमध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकरांनी पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे. पत्नीच्या विवाहबाह्य संबंधांना आक्षेप घेतल्यामुळे पतीची हत्या करण्यात आल्याचेही या अहवालात समोर आले आहे. त्याच बरोबर जोडप्यांमधील आर्थिक कारणावरून वाद, घरगुती भांडणे आणि संशय यावरूनही पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या केल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. एकम न्याय फाउंडेशनने अनेक भीषण घटनांचे पुरावे गोळा केले आहेत. ज्यामध्ये पतीचे तुकडे केले गेले, विषप्रयोग केला गेला, वार केले गेले, गळा दाबला आणि इतर लोकांकडून मारहाण करण्यात आली. अशा अनेक प्रकरणांमध्ये पत्नी पुराव्याअभावी अनेक वेळा पकडली गेली नाही. शिवाय पतीच्या हत्याबाबत पोलिसांची दिशाभूलही करण्यात आली. हत्येची घटना आत्महत्या म्हणून दाखवण्यात आल्याचे प्रकारही यात घडले आहेत. या सर्व प्रकरणांमध्ये पीडितांचे कमाल वय ७५ वर्षे आणि किमान १८ वर्षे आहे.
कोणी मानसिक तर कोणी पत्नीच्या विवाहबाह्य संबंधामुळे सोडले जग
पतीने आत्महत्या केल्याच्या ५१७ प्रकरणांत आत्महत्येमागील कारणांचाही अभ्यास करण्यात आला. त्यातील २३५ आत्महत्या मानसिक क्रूरतेमुळे झाल्या आहेत. ४७ आत्महत्या पत्नीने केलेल्या व्यभिचारामुळे, तर ४५ आत्महत्या खोट्या आरोपांमुळे झाल्याचे या अहवालाच्या माध्यमातून समोर आले आहे. २२ आत्महत्या घरगुती हिंसाचारामुळे झाल्या आहेत. १६८ आत्महत्या संशय, सोडून देणे, फसवणूक किंवा आर्थिक वादामुळे झाल्या आहेत. मानसिक क्रौर्य, खोटे आरोप, पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक हिंसाचार ही प्रमुख कारणे पुरुषांच्या आत्महत्येमागे आहेत.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा (एनसीआरबी) अहवाल पाहिला तर २०२२ मध्ये १,२२,७२४ पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. तर ४८,१७२ महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. २०२२ मध्ये आत्महत्या केलेल्या विवाहित पुरुषांची संख्या ८२ हजार होती. कौटुंबिक समस्यांमुळे ३८,९०४ पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. वैवाहिक समस्यांमुळे ५,८९१ पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत. पुरुषांच्या आत्महत्येचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कौटुंबिक समस्या असल्याचेही समोर आले आहे. महिला गुन्हेगाराकडे समाज, सरकारचे दुर्लक्ष असल्याचे या अहवालात म्हटले आहे. महिलांच्या गुन्ह्याकडे समाज, सरकार, प्रसारमाध्यमे दुर्लक्ष करत आहेत. महिलांकडून होणाऱ्या गुन्ह्यांकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. याबद्दल कधी बोलणेही गरजेचे मानले गेले नाही. त्यामुळे समाजात केवळ पुरुषच हिंसक असल्याचा समज निर्माण झाला आहे.
पुरुषांनाही मदतीची गरज- भारद्वाज
एकम न्याय फाउंडेशनच्या संस्थापक दीपिका नारायण भारद्वाज यांनी सांगितलं की, एकम न्याय फाउंडेशनच्या माध्यमातून आमचा प्रयत्न समाजातील कायदेशीर आणि सामाजिक अवहेलनामुळे पुरुष आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणाऱ्या त्रास आणि समस्यांवर प्रकाश टाकण्याचा आहे. पीडित पुरुषांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत न्याय द्यायला पाहिजे. लिंग तटस्थतेच्या आधारे कायदे करण्याची गरजही आहे. पत्नीकडून होणारा व्यभिचार आणि महिला जोडीदारांकडून होणारी हिंसा यांचा कोणत्याही पुरुषावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पुरुष त्याचे मूकबळी असल्याचेही त्या म्हणाल्या.