संग्रहित छायाचित्र
नवी दिल्ली : देशात प्रदुषण ही गंभीर समस्य़ा बनली असून भविष्यात डिझेलवर चालणाऱ्या वाहणांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावण्यात येणार असल्याचा इशाचा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दिल्लीतील एका कार्यक्रमादरम्यान केल्याचे वृत्त समोर आले. या वृत्तावर गडकरी यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. असा कुठलाही प्रस्ताव तूर्तास सरकारच्या विचाराधीन नसल्याचं म्हणत नितीन गडकरींनी ते वृत्त फेटाळलं आहे.
यासंदर्भात गडकरी यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले त्यामध्ये ते म्हणाले की, ''डिझेल वाहनांवरील विक्रीवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटीची रिफारस केल्याच्या मीडिया रिपोर्टवर तातडीनं स्पष्टीकरणाची गरज आहे. सरकारकडून सद्यस्थितीत असा कोणताही प्रस्ताव देण्यात आलेला नाही. 2070 पर्यंत कार्बन नेट झिरो गाठण्यासाठी आणि डिझेल सारख्या घातक इंधनामुळे होणाऱ्या वायू प्रदूषणाचा स्तर कमी करण्यासाठी, तसेच ऑटोमोबाईल विक्रीतील झपाट्यानं वाढ करण्याच्या आमच्या वचनबद्धतेनुसार, स्वच्छ आणि ग्रीन पर्यायी इंधन सक्रियपणे स्वीकारणं अत्यावश्यक आहे. त्यामुळेच घातक प्रदूषण कमी करणं आणि त्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायी इंधन उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. तसेच, ही इंधनं स्वस्त, आणि पर्यावरणपूरक असणं आवश्यक आहे.''
दिल्लीत पार पडलेल्या 63 व्या सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सच्या कार्यक्रमातील गडकरी यांचे वाहणांवर अतिरिक्त 10 टक्के जीएसटी लावण्यात येणार असल्याचे व्यक्तव्य समाज माध्यमांवर व्हायरल झाले होते. त्यामध्ये देशात प्रदूषण ही गंभीर समस्या बनत चालली असून त्यामुळे आपल्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे. डिझेल इंजिनांवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटीची शिफारस अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना प्रत्यक्ष भेटत आणि पत्र लिहित करणार असल्याची माहिती नितीन गडकरींनी दिल्याचं बोललं जात होतं. तसेच, अतिरिक्त जीएसटी प्रदूषण कराच्या स्वरुपात लावला जाणार असून सोबतच डिझेल वाहनांचं उत्पादन कमी करण्याची उद्योगांना विनंती, तसं न केल्यास केंद्राकडूनच डिझेल इंजिनवर 10 टक्के अतिरिक्त जीएसटी लावण्याचा इशाराही गडकरींनी यावेळी दिल्याचं बोललं जात होतं. दरम्यान या वृत्तानंतर गडकरी यांनी स्वत: ट्वीट करत हे स्पष्टीकरण दिले आहे.