जेव्हा प्रीती शूटिंग सोडून परीक्षा द्यायला गेली होती...
बबली ‘गर्ल’ प्रीती झिंटाने 'सोल्जर' चित्रपटाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान एका मोठ्या कारणामुळे ती अनेक दिवस सेटवरून गायब होती. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सोल्जर’ या चित्रपटात प्रीती झिंटा आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाची कथा आणि गाणीही प्रेक्षकांना खूप आवडली होती. 'सोल्जर' चित्रपटाच्या क्लायमॅक्सच्या शूटिंगदरम्यान असे काही घडले की, प्रीती अनेक दिवस शूटिंगमधून गायब होती. हा खुलासा स्वतः प्रीती झिंटाने तिच्या एका पोस्टद्वारे केला आहे.
‘सोल्जर’ चित्रपटाचा टायटल ट्रॅक इन्स्टावर शेअर करताना प्रीतीने लिहिले की, ‘‘हा माझा दुसरा रिलीज झालेला सिनेमा होता, पण मी तो आधीच साईन केला होता. खरे सांगायचे तर, त्या काळात मी गोंधळले होते की एकाच नावाच्या दोन दिग्दर्शकांसोबत मी काम कसे करू शकेन? धन्यवाद अब्बास भाई आणि मस्तान भाई. राजस्थानमध्ये क्लायमॅक्सचे शूटिंग सुरू असतानाची गोष्ट आहे. मी माझ्या मानसशास्त्राच्या परीक्षेसाठी गेले होते आणि एका आठवड्यापेक्षा जास्त काळ सेटवरून गायब होते, पण त्यावेळी माझ्यावर तुम्ही जरादेखील रागावला नाही. याबद्दल धन्यवाद. मला अभिनयाच्या जगात आणल्याबद्दल धन्यवाद बॉबी.’’
प्रीतीच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून कमेंटचा वर्षाव केला. एका यूजरने लिहिले की, आता सर्वेक्षण केले गेले तर तुम्हाला ९० च्या दशकातील नॅशनल क्रश ही पदवी दिली जाईल. आणखी एका यूजरने लिहिले की, मी बॉलिवूड चित्रपटांच्या या युगाला खूप मिस करतो. कथा, गाणी, अभिनेते... कुणीतरी आपलं बालपण परत करावं.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.