संग्रहित छायाचित्र
बॉलिवूडमधील ‘मी टू’ (MeToo) चळवळीदरम्यान अभिनेता आलोक नाथ (Alok Nath) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले होते. आता नुकत्याच एका मुलाखतीत आलोकसोबत 'हम आपके है कौन' आणि 'परदेस'सारख्या चित्रपटात काम केलेल्या अभिनेत्री हिमानी शिवपुरी (Himani Shivpuri) यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘‘जेव्हा पीत नाहीत तेव्हा ते सुसंस्कारी असतात, परंतु प्यायल्यानंतर ते बदलतात,’’ असे हिमानी यांनी सांगितले.
हिमानी म्हणाल्या, ‘‘एकदा दारू पिऊन गोंधळ घातल्यामुळे आलोक यांना फ्लाइटमधून काढण्यात आले होते. आलोक सामान्यतः ठीक आहे पण रात्री ८ नंतर ते बदलतात. सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत हिमानी शिवपुरी म्हणाल्या, 'आलोक नाथ जरी सेटवर चांगले वागत असले, तरी ते दारू प्यायल्यावर पूर्णपणे बदलायचे.'
अभिनेत्रीने 'हम आपके है कौन'च्या (Hum Aapke Hai Kaun) शूटिंगदरम्यानचा एक प्रसंग आठवला, ज्यामध्ये अभिनेत्याने दारूच्या नशेत गोंधळ घातला होता. ‘‘मी त्यांच्यासोबत याआधी खूप काम केले आहे आणि त्यांच्याबद्दलची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे जेव्हा ते दारू पीत नाही तेव्हा ते सुसंस्कारी असतात. एनएसडीमध्ये घडलेली एक घटना सोडली तर मला त्याच्याशी कधीच अडचण आली नाही. पण मी लोकांकडून ऐकले आहे की काही ड्रिंक्सनंतर ते एक वेगळे व्यक्ती बनतात,’’ असेक हिमानी यांनी सांगितले.
हिमानीने सांगितले की, एकदा फ्लाइटमध्ये मद्यप्राशन केल्याने आलोक नाथ अनियंत्रित झाले. त्यांची पत्नी आणि मी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. सावध राहण्याचा इशाराही दिला होता. अन्यथा त्यांना फ्लाइटमधून काढून टाकले जाईल, असे सांगितल्यावर तो जरा शांत झाला होता.’’ आलोकनाथ यांच्यावर यापूर्वीही फ्लाइटमधून उतरण्याची वेळ आली होती, असा दावा हिमानी यांनी केला.
२०१८ मध्ये लेखिका-निर्मात्या विनता नंदा यांनी आलोकवर बलात्काराचे आरोप केले होते. याशिवाय संध्या मृदुल आणि नवनीत निशान या अभिनेत्रींनीही त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केले होते. तेव्हापासून आलोक 'सोनू के टीटू की स्वीटी' आणि 'दे दे प्यार दे' या दोनच चित्रपटांमध्ये दिसले आहेत.