संग्रहित छायाचित्र
बॉलिवूडमध्ये भूतपटांची सिरीज हिट होणे हा प्रकार ‘भुलभुलैया’च्या निमित्ताने प्रथमच घडला. याच्या पहिल्या भागात विद्या बालनने मध्यवर्ती भूमिका साकारली होती. दुसऱ्या भागासाठीही तिला विचारण्यात आले होते. मात्र, तिने नकार दिला होता. ‘भुलभुलैया ३’साठीही विद्याला विचारणा करण्यात आली होती. यावेळी तिने आनंदाने होकार देत मंजुलिका हे पात्र साकारले.
'भूलभुलैया' फ्रँचायझीचा पहिला चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता आणि तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये त्याची खूप क्रेझ आहे. या चित्रपटात विद्या आणि अक्षयकुमार यांनी काम केले होते. जेव्हा भूषणकुमारने 'भूलभुलैया २' बनवण्याचा विचार केला, तेव्हा त्याने विद्यालाच मंजुलिकाची भूमिका पुन्हा ऑफर केली, परंतु विद्याने नकार दिला. पहिल्या चित्रपटाच्या यशाची पुनरावृत्ती आपण करू शकणार नाही, याची भीती वाटत होती, असे कारण तिने सांगितले. 'भूलभुलैया ३' हा चित्रपट येत्या दिवाळीला काळात १ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.
एका कार्यक्रमादरम्यान निर्माते भूषणकुमार म्हणाले, ‘‘आम्ही विद्याला 'भूलभुलैया २'साठी संपर्क साधला होता, पण तिने नकार दिला. त्यानंतर ट्रेलर लॉन्चच्या वेळी किमान ट्रेलरचा एक भाग बनण्याची विनंती आम्ही केली. यासाठी ती आनंदाने तयार झाली. तिने ट्रेलर पोस्ट केला, चित्रपट आवडला आणि वचन दिले की ती तिसऱ्या चित्रपटाचा भाग असेल.
याबाबत विद्या म्हणाली, ‘‘प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास, 'भूलभुलैया २'साठी विचारणा झाली तेव्हा मी खूप घाबरले होते. कारण 'भूलभुलैया १' ने मला खूप काही दिले आहे. मी स्वत:ला बजावले की, जर तू काही गडबड केली तर सर्व उध्वस्त होईल. त्यापेक्षा तू याचा भाग न झालेली बरी. आपण 'भूलभुलैया १'च्या यशाची पुनरावृत्ती करू शकणार नाही, असे वाटल्याने मी याच्या दुसऱ्या भागात काम करण्यास नकार दिला.’’
आता विद्या पुन्हा 'भूलभुलैया ३'मध्ये सामील होत आहे. ‘‘मला ‘भूलभुलैया २’मध्ये काम करायचे होते, पण भीती वाटत होती. मी अनीसभाईंना सांगितले की मी हा धोका पत्करू शकत नाही. पण जेव्हा तिसऱ्या भागाची ऑफर आली तेव्हा मला स्क्रिप्ट आवडली आणि सर्व गोष्टी चांगल्या झाल्या. मलाही ‘भूलभुलैया २’ आवडला होता. त्यामध्ये कार्तिकही होता, तिसऱ्या भागाला होकार दिला तेव्हा माधुरी दीक्षितही तिथे होती. मी धैर्य एकवटले आणि मनाचे ऐकून निर्णय घेतला. ‘भुलभुलैया ३’मध्ये काम करताना मजा आली. अनीसभाई हे मनोरंजनाचे बादशहा आहेत, त्यांच्यासोबत काम करणे स्वप्नवत होते.’’