File Photo
अभिनेता अरबाज खान आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांचा घटस्फोट होऊन सुमारे सात वर्षे झाली असली तरी त्यांच्यातील नातं आजही आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अरबाजने मलायका आणि त्यांच्या विभक्त जीवनाबद्दल आपली भूमिका मांडली. त्याने मुलगा अरहान खानने त्यावेळच्या कठीण परिस्थितीत घेतलेली समजूतदार भूमिका कशी महत्त्वाची ठरली यावरही प्रकाश टाकला.
डिसेंबर २०२३ मध्ये अरबाजने मेकअप आर्टिस्ट शूरा खानसोबत लग्न केलं, ज्यात अरहानही सहभागी होता. लग्नानंतर अरहानला त्याच्या सावत्र आईसोबत अनेकदा पाहिलं गेलं असून, या प्रसंगाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहेत.
अरहानविषयी बोलताना अरबाज म्हणाला, मलायकासोबत विभक्त झाल्यानंतरही अरहानमुळे आमचे नाते कायम आहे. आमच्यातील आठवणींचा मोठा भाग अरहान आहे. विभक्त होण्याचा निर्णय घेतल्यावरही अरहानसोबतचं नातं आम्हाला जोडून ठेवलं आहे. तसेच तो पुढे म्हणाला, मलायकाच्या कुटुंबासोबतही आमचं नातं चांगलं आहे. अरहानने घटस्फोटानंतरची परिस्थिती समजून घेतली आणि मोठा होत असल्याने त्याला हे सर्व अधिक स्पष्टपणे समजायला लागलं आहे.
काही दिवसांपूर्वी मलायकाच्या वडिलांच्या निधनानंतर, अरबाज तिच्या घरी सर्वांत आधी पोहोचला होता. त्या वेळी खान कुटुंबही तिच्या कुटुंबासोबत उभं राहिलं. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.