'माझ्या वयाला साजेसे विनोद लिहिणारे लेखकच नाहीत'
सध्या केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या वेळी चित्रपटातील अभिनेते व अभिनेत्रींनी हजेरी लावली होती. शिवाय मराठीतील ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफही उपस्थित होते. दरम्यान, अशोक सराफ यांना मराठी चित्रपटामध्ये काम करण्याबाबत विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी अगदी स्पष्ट शब्दांमध्ये उत्तर दिले. तसेच, विनोदी कथा लिहिणारे लेखकच आता नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
अशोक सराफ म्हणाले, “सध्या मी चित्रपट करत नाही. कारण एखादी कथा मला लिहून देणारा कोणी लेखकच नाही. विनोदवीर म्हणून मला ओळखले जाते. सगळ्यांच्या नजरेत मी फक्त विनोदवीर आहे, पण इतरही भूमिका मी करू शकतो हे त्यांना माहीत नाही किंवा मी वेगळ्या भूमिका करु शकतो याची त्यांना खात्री वाटत नाही. त्यामुळे कुणीही मला इतर भूमिकांसाठी विचारत नाही. फक्त विनोदवीर म्हणूनच माझा विचार करतात.”
“माझ्या वयाची आणि माझ्या स्टाइलची विनोदी कथा लिहिणारा लेखक तरी कोण आहे?. माझ्या स्टाइलची कथा लिहिणार लेखक कोणीही नाही याचीच मला मोठी खंत वाटते. विनोदी कथा समोर का नाही येत? आणि जे विनोदी कथा लिहितात त्याला कॉमेडी म्हणायचे म्हणजे आपण स्वतःला फसवण्यासारखे आहे. त्यामुळे मी सध्या काही करत नाही. माझ्याकडे कथा येतात, पण मी वाचतो आणि त्यांना नकार कळवतो. कारण मला ते काम करावसे वाटत नाही”.
“मला जर ती कथा वाचून काम करावसे वाटेल, तरच मी ते करणार. जी कथा मला पटत नाही ते काम मी करत नाही. जर कोणी चांगली कथा माझ्याकडे आणली, तरच मी काम करेन. माझ्या वयाचा विनोद आताचे लेखक लिहू शकणार नाहीत. मला आता हिरो, हिरोच्या मित्राची भूमिका नाही मिळणार. फक्त आता मला वडिलांच्या भूमिका साकारायला मिळणार. आणि कुठला बाप कॉमेडी असतो? एक वेळ होती की, ज्यामध्ये वडील कॉमेडी दाखवायचे, पण आता तसे घडत नाही. मुळातच तसे लिहिणारं कोणी नाही. त्यामुळे काही होऊ शकत नाही.” अशोक सराफ सध्या नाटकांमध्ये काम करत आहेत.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.