संग्रहित छायाचित्र
संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली ‘लव्ह अँड वॉर’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. आलिया भट, रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा सेटमुंबईतील फिल्मसिटीमध्ये तयार झाला आहे.
नुकत्याच हाती आलेल्या रिपोर्टनुसार, फिल्म सिटीच्या ‘स्टुडिओ फाईव्ह’मध्ये या चित्रपटाचा सेट तयार करण्यात आला आहे. हा सेट ऐतिहासिक बनला आहे. संजय लीला भन्साळी येत्या गुरुवारपासून (दि. ७) येथे शूटिंग सुरू करणार आहेत. चित्रपटाचे पहिले शेड्यूल रणबीर कपूरसोबत सुरू होणार आहे. विकी कौशल एका आठवड्यानंतर शूटिंगचा भाग होणार आहे, तर आलिया भट्ट डिसेंबरपासून तिच्या भागाचे शूटिंग सुरू करणार आहे.
मुख्य कलाकारांव्यतिरिक्त पहिल्या शेड्यूलमध्ये ५० कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे, जे सैनिकांच्या भूमिका साकारणार आहेत. संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट परिपूर्णता आणि तपशीलांसाठी ओळखले जातात. ‘लव्ह अँड वॉर’ हा एक युद्धपट आहे. या चित्रपटाशी संबंधित प्रत्येक छोट्या-छोट्या गोष्टींकडे भन्साळी यांच्याकडून जातीने लक्ष दिले जात आहे.
चित्रपटाशी संबंधित कोणतीही माहिती लीक होऊ नये, याची काळजी घेण्यासाठी भन्साळी यांच्या टीममधील काही विश्वासू सदस्यांशिवाय कोणालाही सेटवर जाण्याची परवानगी नाही. ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाच्या घोषणेच्या वेळी निर्मात्यांनी सांगितले होते की हा चित्रपट पुढील वर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित केला जाईल. परंतु आता हा चित्रपट मार्च २०२६ मध्ये प्रदर्शित होईल, असे भन्साळी यांच्या गोटातून सांगण्यात आले आहे.
संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला शेवटचा चित्रपट ‘गंगूबाई काठियावाडी’ होता, यामध्ये आलिया मुख्य भूमिकेत होती. गेल्या वर्षी संजय लीला भन्साळी यांनी ओटीटीवर ‘हीरामंडी’ या मालिकेद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. लवकरच तें हिरामंडीचा दुसरा सीझन घेऊन येणार आहे. याशिवाय ते येत्या काळात ‘मन बैरागी’ या चित्रपटाची निर्मिती करणार आहे. भन्साळी यांनी यापूर्वी कसाही मुलाखतींमध्ये याबाबत वक्तव्य केले होते.
आलियाचा नुकताच ‘जिगरा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ९० कोटींमध्ये बनलेला हा 'हज' चित्रपट ५५ कोटींचीही कमाई करू शकला नाही. या चित्रपटात तिच्यासोबत वेदांग रैना मुख्य भूमिकेत होता. ती लवकरच ‘अल्फा’ आणि ‘ब्रह्मास्त्र २’मध्ये दिसणार आहे. तर रणबीरकडे ‘रामायण,’ ‘ब्रह्मास्त्र २’ सारखे मोठे चित्रपट आहेत.