File Photo
चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान त्यांच्या पहिला हिट चित्रपट ‘मुन्नाभाई एमबीबीएस’बद्दल सांगितले. ते लवकरच ‘मुन्नाभाई-३’ ची घोषणा करण्याची शक्यता आहे.राजकुमार हिरानी म्हणाले, ‘‘माझ्याकडे मुन्नाभाईसाठी एक-दोन नव्हे, तर पाच अपूर्ण स्क्रिप्ट आहेत.
मी एका स्क्रिप्टवर सहा महिने काम केले. पण मध्यंतरापर्यंतच पोहोचू शकलो. एक स्क्रिप्ट मुन्नाभाई एलएलबी, दुसरी मुन्नाभाई चले बेस, मुन्नाभाई चले अमेरिका आणि आणखी काही आहेत. अद्याप यापैकी एकही स्क्रिप्ट फायनल झालेली नाही. ‘मुन्नाभाई-३’ नक्की येणार आहे. मात्र, त्यासाठी काही काळ वाट बघावी लागेल.’’
‘मुन्नाभाई -३’ ची कथा लिहिणे आपल्यासाठी खूप आव्हानात्मक असल्याचे यावेळी हिरानी यांनी सांगितले. ‘‘या चित्रपटाची कथा निवडताना मी काही महत्वपूर्ण गोष्टींची काळजी घेणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे, हा चित्रपट मला पहिल्या दोन चित्रपटांपेक्षा जास्त चांगला बनवायचा आहे. दुसरे म्हणजे, आजच्या काळात सिनेमात खूप काही दाखवले गेले आहे, त्यामुळे चित्रपटाच्या कथेत काहीतरी नवीन जोडावे लागेल जेणेकरून लोकांना तो पाहता येईल. तथापि, माझ्याकडे एक अनोखी कल्पना आहे ज्यावर मी काम करत आहे,’’ असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
हिरानी मजेशीरपणे म्हणाले, ‘‘माझी सर्वात मोठी भीती ही आहे की एक दिवस संजय दत्त माझ्या घरी येईल आणि मुन्नाभाईचा पुढचा चित्रपट लवकर बनवण्याची धमकी देईल.’’‘मुन्नाभाई एमबीबीएस’ २००३ मध्ये रिलीज झाला होता. त्यानंतर २००६ मध्ये 'लगे रहो मुन्नाभाई' रिलीज झाला. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले होते. आता हिरानी ‘मुन्नाभाई-३’ बनवण्याबाबत गांभीर्याने विचार करत आहेत.