नानाची अशीही दहशत!
बाॅलिवूडमधील दिग्गज कलाकारांमध्ये नाना पाटेकरचा समावेश होतो. नानाने ‘प्रहार,’ ‘यशवंत,’ ‘अग्निसाक्षी,’ ‘तिरंगा,’ ‘क्रांतिवीर’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले आहे. नानाने केवळ मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवरदेखील राज्य केलं. त्याचे डायलॉग्स, दमदार अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. यामुळेच की काय, हिंदी चित्रपटसृष्टीचा एक असा सुपरस्टार होता जो नानासोबत काम करायला कचरायचा. या अभिनेत्याची ओळख 'धाकड' अशी असली तरी नानासोबत काम करायचं म्हटलं की त्याला धाकधूक वाटायची. हा स्टार अभिनेता म्हणजे राजकुमार. त्याने डायलॉग बोलताच थिएटरमध्ये लोक शिट्ट्या वाजवायचे. 'जानी' या आपल्या कॅचफ्रेजने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारा राज कुमार हा बिनधास्त कलाकारांपैकी एक होता. तो आपल्या स्पष्टवक्तेपणामुळे कायम चर्चेत राहिला, पण हा अभिनेता नानांसोबत काम करायला घाबरायचा.
असे असूनही ‘तिरंगा’ या चित्रपटात दोघे एकत्र आले होते. मेहुलकुमार यांनी राजकुमारला एका भूमिकेसाठी आधीच साइन केले होते. दुसऱ्या भूमिकेसाठी नाना पाटेकरला साइन करायचे होते. जेव्हा नानाला कळलं की राजकुमार चित्रपटात आहे. हे ऐकून त्याने चित्रपट करण्यास नकार दिला. कसेबसे मेहुलने नानांची समजूत घातली आणि नाना ‘तिरंगा’ चित्रपट करायला तयार झाले, पण त्यांनी एक अट घातली की, जर राजकुमार त्याला काही उलटसुलट बोलला तर तो चित्रपट अर्धवट सोडून देईल.
जेव्हा राजकुमारला कळलं की त्याला नानासोबत काम करायचं आहे, तेव्हा तो मेहुल यांना म्हणाला, ‘‘तू नानाला चित्रपटात का घेतलंस, तो खूप अशिक्षित आहे. तुला दुसरं कोणी सापडलं नाही का?’’ राजकुमार यांनी संपूर्ण चित्रपटात नानापासून अंतर राखलं. दोन मुडी स्टार असूनही 'तिरंगा' चित्रपट सहा महिन्यात पूर्ण झाला होता.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.