File Photo
मनोरंजन विश्वात आपलं स्वत:चं नाव, आपली ओळख निर्माण करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. कोणाच्याही पाठबळाशिवाय यश मिळवणं अजिबात सोपं नाही. एक अभिनेत्री जी संघर्षाच्या काळात पैसे वाचवण्यासाठी दिवसातून एकदा जेवायची. ती आपल्या मेहनतीच्या जोरावर आजघडीला साऊथमधील सुपरस्टार असून साहजिकच कोट्यवधींची मालकीण आहे. मनोरंजनसृष्टीतील ही सुपरवूमन म्हणजेच समंथा रुथ प्रभू.
सलमान आणि शाहरुख खान यांच्यासारख्या बड्या सुपरस्टारबरोबरचे सिनेमे तिने नाकारले… इंडस्ट्रीत कोणताही पाठिंबा नसताना तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री आणि भारतातील सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिला ओळखलं जातं. यावरून समथाने मिळवलेल्या यशाचा अंदाज सहज येईल.
समंथाला दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. मात्र, एकेकाळी तिच्या उच्च शिक्षणासाठी तिच्या आई-वडिलांकडे पैसे नव्हते. याबद्दल सांगताना ती म्हणते, “शिकत असताना माझे आई-बाबा मला नेहमी सांगायचे, ‘खूप अभ्यास कर आणि मोठी होऊन दाखव.’ मी मनापासून अभ्यास केला. दहावी, बारावी आणि पुढे कॉलेज पूर्ण केलं. पण, त्यानंतरच्या शिक्षणासाठी माझ्या पालकांकडे पैसे नव्हते. त्यांना कॉलेजची फी परवडण्याजोगी नव्हती. त्यामुळे माझ्याकडे जेवणासाठीही पैसे नसायचे. मी जवळपास दोन महिने दिवसातून फक्त एकदा जेवायचे. शिक्षण सुरू असताना मी काही ठिकाणी नोकऱ्यादेखील केल्या.”
१४ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘ये माया चेसावे’ या तेलुगू चित्रपटातून समंथाने मनोरंजनविश्वात पदार्पण केलं. यानंतर तिने ‘डूकुडू’, ‘ईगा’, ‘कठ्ठी’, ‘जनता गॅरेज’, ‘थेरी’, ‘रंगस्थलम’ असे सातत्याने सुपरहिट सिनेमे दिले. कालातरांने ती दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली. आता ती प्रत्येक चित्रपटासाठी सुमारे दोन ते तीन कोटींच्या घरात मानधन आकारते. मनोज बाजपेयींच्या ‘द फॅमिली मॅन’ या वेबसीरिजमुळे समांथा रातोरात देशभरात लोकप्रिय झाली.
समंथाला शाहरुखच्या ‘जवान’ची ऑफर देण्यात आली होती. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे तिने हा चित्रपट नाकारला होता. यानंतर ‘जवान’ची प्रमुख भूमिका नयनताराच्या वाट्याला आली. एकेकाळी पैशासाठी संघर्ष करणारी ही अभिनेत्री आता आलिशान जीवन जगत आहे. ८ तासांची नोकरी करून ५०० रुपये पहिला पगार घेणारी समंथा आता सुपरस्टार म्हणून ओळखली जाते. तिच्याकडे ८० कोटींचं घर आहे. तर, तिची एकूण संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त आहे.
feedback@civicmirror.in