सलग सहा फ्लॉप!
बाॅलिवूडमध्ये तुमच्या अभिनयाचे नाणे खणखणीत असले तरच यश मिळते. तेथे आई-बापाची पुण्याई कामाला येत नाही. याची अनेक उदाहरणे देता येतील. झक्कास फेम अभिनेता अनिल कपूरची कन्या अभिनेत्री सोनम कपूर आज ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या फार सक्रिय नसलेल्या सोनमने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिट चित्रपट दिले आहेत. तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना तिच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर असे दिसते की, बापाच्या पुण्याईपेक्षा तिला यशस्वी ठरण्यासाठी आपल्यातील अभिनय कौशल्याचाच फार फायदा झाला. सोनम कपूरने बॉलिवूडमध्ये एंट्री तर मोठ्या बॅनरखाली केली. मात्र तिला याचा काही खास उपयोग झाला नाही. दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्या 'सावरिया' या चित्रपटातून सोनमने रणबीर कपूरसह बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. त्यांनी प्रयत्न करूनही हा चित्रपट फ्लॉप ठरला.
सावरिया नंतर दिल्ली -६, आयेशा, थँक यू, मौसम आणि प्लेयर्स या चित्रपटातून तिने काम केले. मात्र, हे चित्रपट फ्लॉप ठरले. एकामागून एक सहा फ्लॉपमुळे सोनमची प्रतिमा खराब झाली. त्यानंतर सोनमचा पहिला हिट चित्रपट ठरला तो साऊथचा स्टार धनुष सोबतचा 'रांझना'. या चित्रपटात धनुष आणि सोनमची जोडी प्रेक्षकांना कमालीची आवडली. त्यानंतर तिने फरहान अख्तरसोबत 'भाग मिल्खा भाग' हा सुपरहिट चित्रपट दिला. या चित्रपटाने तिच्या करिअरला यशाचे शिखर गाठता आले. त्यानंतर तिने सलमान खानसोबत 'प्रेम रतन धन पायो', 'निरजा' हे हिट चित्रपट दिले. यानंतर सोनमने रणबीर कपूरसोबत 'संजू' या चित्रपटात काम केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. हा तिचा शेवटचा हिट चित्रपट. आता सध्या सोनम चित्रपटात कमी सक्रिय आहे. ती शेवटची 'द झोया फॅक्टर ' चित्रपटात दिसली होती. तसेच आता ' ब्लाइंड ' या चित्रपटातून प्रेक्षकांना दिसणार आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.