'गुलाबजाम २'मधून सिद्धार्थचा पत्ता कट?
अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि सोनाली कुलकर्णीचा ‘गुलाबजाम’ चित्रपट आजही रसिकांच्या स्मरणात आहे. पाककृतीवर बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटातील सिद्धार्थ आणि सोनालीची क्रेमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली होती. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र, या दुसऱ्या भागातून सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
गुलाबजाम चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली आहे. तसेच, या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात मोठा बदलही करण्यात आला आहे. 'गुलाबजाम २'मधून सिद्धार्थ चांदेकरचा पत्ता कट करण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. सिद्धार्थच्याऐवजी वैभव तत्ववादी सोनाली कुलकर्णीबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे.
‘गुलाबजाम’ ही लंडनमध्ये राहणाऱ्या एका मराठी माणसाची कथा आहे. आदित्य (सिद्धार्थ चांदेकर) हा काही खास मराठी खाद्यपदार्थ शिकण्यासाठी भारतात येतो. भारत भेटीत तो पुण्यात राहणाऱ्या राधाला (सोनाली कुलकर्णी) भेटतो. ती त्याला पारंपरिक मराठी पाककृती शिकवण्याचा निर्णय घेते. इथूनच त्यांच्या सुंदर आणि अर्थपूर्ण मैत्रीची सुरुवात होते. पण मैत्रीचे हे नाते कसे पुढे जाते, त्यात कशी वळणे येतात हे सर्व या चित्रपटात दाखवण्यात आले होते.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.