संग्रहित छायाचित्र
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान अनेक वर्षांपासून चेन स्मोकर आहे. शाहरुखने स्वतः एका मुलाखतीत सांगितले होते की, तो दिवसाला १०० सिगारेट ओढत असे, मात्र आता त्याने सिगारेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच, त्याच्या ५९व्या वाढदिवसानिमित्त एका कार्यक्रमाचा भाग असलेल्या शाहरुखने चाहत्यांशी संवाद साधताना सांगितले की, त्याने धूम्रपान सोडले आहे. मात्र, यामुळे त्याला आरोग्याच्या काही समस्या भेडसावत आहेत.
गेल्या शनिवारी शाहरुख त्याच्या वाढदिवसानिमित्त वांद्रे येथील रंग मंदिर सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहभागी झाला होता. यादरम्यान तो म्हणाला, ‘‘मित्रांनो आणखी एक चांगली गोष्ट आहे. आता मी सिगारेट पीत नाही. शाहरुखचे हे ऐकून सभागृहातील चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. मला वाटले की धूम्रपान सोडल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होणार नाही, पण तसे नाही. तो म्हणाला, मला वाटले की मला श्वास घेण्यास काही त्रास होणार नाही, पण तरीही मला ते जाणवत आहे. इन्शाअल्लाह पण बरे होईल.’’
काही वर्षांपूर्वी शाहरुखने सांगितले होते की, त्याला त्याची मुले आर्यन, सुहाना आणि अबरामसाठी धूम्रपान सोडायचे आहे. शाहरुखसोबत कोयला चित्रपटात काम केलेला अभिनेता प्रदीप रावत याने अलीकडेच एका मुलाखतीत सिद्धार्थ काननला सांगितले होते की, शाहरुख चेन स्मोकर आहे. तो म्हणाला होता, शूटिंगदरम्यान मी शाहरुखच्या फार जवळ नव्हतो, पण तो खूप चांगला स्वभावाचा माणूस आहे. मला एक गोष्ट आठवते ती म्हणजे शाहरुख जितका स्मोकिंग करतो तितका मी इतर कोणत्याही अभिनेत्याला पाहिलेले नाही. तो एक सिगारेट पेटवायचा आणि मग त्याच सिगारेटमधून दुसरी आणि नंतर तिसरी पेटवायचा. तो खरा चेन स्मोकर आहे. पण चित्रपटांप्रती त्याच्या समर्पणाला मर्यादा नाही.
२०१२मध्ये शाहरुख त्याची टीम कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील मॅच पाहण्यासाठी जयपूरमध्ये आला होता. यावेळी तो सवाई मानसिंग स्टेडियममध्ये जाहीरपणे सिगारेट ओढताना दिसला. त्यावेळी जयपूर न्यायालयाने त्याला दोषी ठरवून दंड ठोठावला होता.