शहनाजचे स्वप्न!
शहनाज गिल बॉलिवूडची उभरती अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बिग बॉस मधील हजेरीनंतर शहनाज देशभर प्रसिद्ध झाली असून व्यावसायिकदृष्ट्याही तिला बिग बॉसचा फायदा झाला आहे. पंजाबी गायकांबरोबर प्रारंभ केलेल्या शहनाजला आता सलमान खान बरोबर किसी का भाई किसी की जान या चित्रपटात काम करावयास संधी मिळाली आहे. हा चित्रपट उद्या, शुक्रवारी पडद्यावर येत असला तरी त्या अगोदरच शहनाजने लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. सलमान भाईजानबरोबर काम करायचे स्वप्न आता पडद्यावर उतरत असल्याने शहनाज प्रचंड आनंदात आहे.
एका मुलाखतीत सलमानबरोबर काम करण्याविषयी शहनाज म्हणते की, सलमान बरोबर काम करण्याचे स्वप्न कधी अस्तित्वात येईल का, असे मला अनेकजण विचारायचे. याबाबत मात्र मी प्रचंड आशावादी होते. माझ्या आईला मी आयुष्यात कधी ना कधी सलमानबरोबर काम करेन असे नेहमी वाटायचे. सलमान बरोबर काम करावयास मिळाल्याने सध्या तरी मी ‘सातवे आस्मान पर ’आहे असे म्हणता येईल. येथून पुढे आयुष्यात सतत चांगल्या घटना घडतील असेच मला वाटते. भाईजानकडून मला खूप काही शिकावयास मिळाले. ते मला सेटवर नेहमी प्रेरणा देत राहायचे. आयुष्याच्या पुढील टप्प्यात काय करावयास हवे, याचेही ते मार्गदर्शन करायचे. आताही अनेक वेळा मी त्यांचा सल्ला घेत असते.
बिग बॉसच्या सेटवरील सलमान आणि चित्रपटाच्या सेटवरील सलमान या दोन वेगवेगळ्या व्यक्ती असतील असे अनेकांना वाटत असेल असे सांगून शहनाज म्हणते की, असा अनेकजणांचा समज झालेला आहे. तसे काही नाही. चित्रपटाच्या सेटवरील सलमान आणि बिग बॉसवरील सलमान यांच्यात काहीही फरक नाही. बिग बॉसचे सूत्रसंचालन असो की आयुष्यातील नेहमीचे दिवस सलमान यांच्या वागण्यात काही फरक पडत नाही. सलमान मागेल त्याला सल्ला देतात. मात्र, हा सल्ला ते काही फुकट वाटत नाहीत. सलमान काही माझे गुरू किंवा शिक्षक नाहीत. मात्र, तुम्ही सल्ला मागितला तर ते जरूर देतात. विशेष म्हणजे हा सल्ला चांगला आणि मोलाचा असतो. किसी का भाई किसी की जान या आपल्या चित्रपटाविषयी शहनाज म्हणते की, माझे सलमान सरांच्या बरोबर काम करायचे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण झाले असेच मी म्हणेन. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे असो, त्यांच्या बाजूला किंवा समोर उभे राहणे असो, त्यांच्यासमवेत काम करणे असो, सतत तुम्हाला जाणवत राहते की, तुम्ही सलमान सरांबरोबर आहात. आता जेवढे काम मी त्यांच्याबरोबर केले आहे, त्यापेक्षा अधिक काम मला त्यांच्यासमवेत भविष्यात करावयास आवडेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.