संग्रहित छायाचित्र
मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे संतोष जुवेकर. नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चार माध्यमांमध्ये आपल्या जबरदस्त अभिनयाने संतोष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. ६ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘छावा’ या हिंदी चित्रपटात संतोष जुवेकर महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. ‘छावा’नंतर संतोषची वर्णी अनुराग कश्यपच्या आगामी प्रोजेक्टमध्ये लागली आहे. याच निमित्ताने संतोषने नुकतीच सोशल मीडियावर अनुराग कश्यपसाठी खास पोस्ट लिहिली आहे.
अभिनेता संतोष जुवेकरने अनुराग कश्यपबरोबरचा फोटो शेअर करत लिहिले आहे की, हा एक माथेफिरू दिग्दर्शक आहे. वेड्यासारखे काम करत राहायचे या माणसाचे व्यसन आहे आणि या वेड्या दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचे वेड, स्वप्न माझे फार आधीपासून होते. इतके मनापासून पाहिलेले स्वप्न अखेर पूर्ण झालेच. मुझे (अनुराग कश्यप) बाबा का बुलावा आ ही गया.
आतापर्यंत अनेक उत्तमोत्तम दिग्दर्शकांबरोबर काम करण्याची संधी मला मिळाली आहे आणि त्यांच्या प्रत्येकाच्या आपापल्या वेगवेगळ्या शैलीत काम करण्याचा अनुभवही मी कमावला आहे. अनुराग सरांबरोबर काम करण्याआधी त्यांची कामाची स्टाइल व कामाच्या पद्धती बद्दल ऐकून होतो. पण गेले काही दिवस त्यांच्याबरोबर काम करताना ह्याची देही ह्याची डोळा अनुभव घेतोय. माझ्यासाठी या सिनेमात काम करणे म्हणजे एक कार्यशाळा आहे.