संग्रहित छायाचित्र
सलमान खानला पुन्हा एकदा अभिनेता लॉरेन्सच्या नावाने धमकी मिळाली आहे. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात आलेल्या कॉलमध्ये सलमानने बिश्नोई समाजाच्या मंदिरात जाऊन काळवीटाची शिकार केल्याबद्दल माफी मागितली नाही किंवा पाच कोटी रुपये दिले नाहीत तर त्याचा जीव जाऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला एक संदेश आला. मध्यरात्री एका अधिकाऱ्याची त्या मॅसेजवर नजर पडली. मेसेजमध्ये लिहिले होते, ‘‘जर सलमान खानला जिवंत रहायचे असेल तर त्याला आमच्या मंदिरात जाऊन माफी मागावी लागेल किंवा पाच कोटी रुपये द्यावे लागतील. आमची टोळी अजूनही सक्रिय आहे.’’
यापूर्वी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर ऑक्टोबरमध्ये सलमानला दोनदा धमक्या आल्या होत्या. २५ ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशानच्या कार्यालयाला मेसेज पाठवण्यात आला होता. त्यात दोन कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. सलमान आणि झिशानने पैसे न दिल्यास त्यांची हत्या केली जाईल, असे सांगण्यात आले होते. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी २० वर्षीय मोहम्मद तय्यब याला नोएडा येथून अटक केली होती. ३० ऑक्टोबर रोजी सलमानला धमकीचे मेसेज पाठवल्याप्रकरणी ५६ वर्षीय आझम मोहम्मद मुस्तफाला अटक करण्यात आली. मुंबईच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज पाठवण्यात आला होता. सलमानने दोन कोटी रुपये दिले नाहीत तर त्याला ठार मारले जाईल, असे या मेसेजमध्ये म्हटले होते.
सध्या सलमान ‘सिकंदर’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जीवे मारण्याच्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर तो चित्रपटाच्या शूटिंगसाठी हैदराबादच्या प्रसिद्ध ताज फलकनुमा पॅलेसमध्ये शूटिंग करत आहे. त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने राजवाड्यातही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.