सलमान माझ्यासाठी मसिहा आहे
दिग्दर्शक निखिल अडवाणीचा 'वेदा' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत नुकतेच निखिल अडवाणी, शर्वरी वाघ आणि अभिषेक बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी निखिल अडवाणी म्हणाला, ‘‘सलमान माझ्यासाठी मसिहा आहे, पण त्याच्यासोबत काम करून मी बॉक्स ऑफिसवरील आकड्यांचा ताण घेऊ शकत नाही.’’
शर्वरी वाघने सांगितले की, जॉन अब्राहमकडून तिला 'वेदा' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मिळालेल्या ॲक्शन टिप्स तिच्या पुढच्या 'अल्फा' चित्रपटासाठी उपयुक्त ठरत आहेत. 'वेदा' चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल बोलताना निखिल अडवाणी म्हणाला, ‘‘ज्या कलाकारांना माझा चित्रपट करायचा आहे त्यांना मी कास्ट करतो.
मला माहित होते की मला जॉनसोबत चित्रपट करायचा आहे. 'बाटला हाऊस' नंतर आपण काय करायचे यावर बोलत होतो. जॉन जेव्हा कधी मला भेटायचा तेव्हा तो एकच विचारायचा, तू काही लिहिले आहेस का? मी 'मुंबई डायरीज' आणि 'रॉकेट बॉईज'मध्ये व्यस्त होतो. जॉन त्यावेळी 'सत्यमेव जयते २' करत होता.’’
निखिल अडवाणीने सलमान आणि शाहरुख खान सारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे, पण आता त्याला सलमान खानसोबत काम करायचे नाही. निखिल म्हणाला, ‘‘सलमान खान माझा मसिहा आहे; पण आता मला त्यांच्यासोबत चित्रपट करायचा नाही, कारण हे लोक आता बॉक्स ऑफिसवर हजारो कोटींच्या कमाईबद्दल बोलत आहेत.
मला माझ्या कथा एका मनोरंजक पद्धतीने सांगायच्या आहेत, ज्यामध्ये एक संदेश आहे. मला मर्यादित बजेटमध्ये चित्रपट बनवायचा आहे. मला हजार कोटींचा ताण घ्यायचा नाही. माझी मुलगी बारावीत शिकत आहे. मला माझ्या पत्नी आणि मुलीसोबत शांततेने जगायचे आहे. त्यांच्यासोबत रेस्टॉरंटमध्ये जायचे आहे. मला खूप आरामात झोपायचे आहे. बॉक्स ऑफिस नंबर्सचा ताण घेऊ शकत नाही.’’