आजही रोमान्स किंग!
बॉलिवूड बादशाह म्हणून ओळखला जाणारा शाहरुख खान हा रोमान्स किंग म्हणून ओळखला जातो. सुपरस्टार असेलल्या शाहरुख खानने यशराज फिल्म्सच्या 'पठाण' चित्रपटातून तब्बल चार वर्षानंतर रुपेरी पडद्यावर पुनरागमन केले. या चित्रपटाने विक्रमी कामगिरी करत शाहरुख आजही सुपरस्टार असल्याचे सिद्ध केले. शाहरुख खानला किंग खान म्हणण्यामागे एक मोठे कारण आहे, ते म्हणजे त्याचे चाहते. जगभरातील त्याच्या चाहत्यांची संख्या अफाट आहे. आजही शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर असतात आणि त्याच्या मन्नत बंगल्याबाहेर मोठी गर्दीही करतात.
बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून म्हणूनही शाहरुख ओळखला जातो. महिलांमध्ये त्याचे मोठे आकर्षण असून अनेकजणी त्याच्यासाठी वेड्या होतात. त्यांचे हे वेडेपण नुकत्याच एका व्हीडीओतून पुन्हा एकदा दर्शनाला आले आहे. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हीडीओमधून महिलांवर्गात आजही त्याची किती क्रेझ आहे हे कळते.
अलिकडेच शाहरुखला एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दुबईतील जावे लागले. तेथे त्याच्या मित्राच्या रिअल इस्टेट ब्रँडची जाहिरात करायची होती. या कार्यक्रमात शाहरुखला पाहिल्यानंतर चाहते वेडे झाले. सर्वच त्याला भेटण्यासाठी उत्सुक होते. त्यातच शाहरुखला समोर पाहून एका महिला चाहती इतकी अनावर झाली की तिने त्याचे थेट चुंबन घेतले. खरे तर ती हस्तांदोलन करायला पुढे आली. मात्र, शाहरुखला पाहिल्यावर तिने सरळ चुंबनच घेतले. हा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
व्हीडीओमध्ये शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानी आणि अंगरक्षक दिसत आहे. आधी त्याच्या एका चाहत्याने हस्तांदोलन केले आणि नंतर त्याच्या हाताचे चुंबन घेतले. यानंतर प्रेमात पागल असेलली महिला आली. या वेळी तिने थेट शाहरुखला विचारले की मी तुला किस करु का? या प्रश्नानंतर उत्तराची प्रतीक्षा करण्याऐवजी जोरदार चुंबन घेऊन तिने विषय संपवला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या शाहरुखच्या पठाण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे. सध्या शाहरुख खान त्याच्या आगामी 'जवान' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्याचे चाहतेही त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट यावर्षी ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.