संग्रहित छायाचित्र
तब्बल २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने निर्माता-दिग्दर्शक करण जोहरला पत्र लिहिले आहे. या माध्यमातून त्याने आपली एकेकाळची प्रेयसी जॅकलीन फर्नांडिससाठी धर्मा प्रॉडक्शनमधील हिस्सा खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
सुकेश सध्या तुरुंगात आहे. या पत्राद्वारे त्याने करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा ५० ते ७० टक्के हिस्सा खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सुकेशच्या पीआर टीमने सदर पत्र सोशील मीडियावर शेअर केले आहे. या पत्रात करणने प्रस्ताव स्वीकारल्यास ४८ तासांच्या आत करार पूर्ण करण्याची ग्वाहीदेखील देण्यात आली आहे. याबरोबरच सुकेशने आपल्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे म्हटले आहे.
धर्मा प्रॉडक्शन गुंतवणुकीच्या शोधात असून सुकेशची ‘एलएस होल्डिंग्ज कंपनी’ करणच्या कंपनीच्या वाढीस मदत करण्याचे उद्दिष्ट ठेवत असल्याचेही पत्रात लिहिले होते. अलिकडच्या वादांमुळे कदाचित त्याचा प्रस्ताव असामान्य वाटू शकतो, असेही सुकेश म्हणाला. पण त्याचा हेतू प्रामाणिक असल्याचे त्याने पत्रात आवर्जून नमूद केले.
या पत्रात सुकेशने करण कौतुक केले आहे. करणला अद्भुत व्यक्ती आणि जॅकलिनला आपल्या आयुष्यातील प्रेम, असे संबोधून तो म्हणतो, ‘‘माझ्यासाठी चित्रपट हा केवळ व्यवसाय नसून एक आवड आणि भावना आहे. व्यक्तिशः मला चित्रपटांची आवड आहे. जॅकलीन माझे प्रेम आहे. मला तिच्यासाठी हे करायचे आहे.’’
सुकेश चंद्रशेखर गेल्या काही वर्षांपासून तुरुंगात आहे. त्याच्यावर २०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. सुकेश आणि जॅकलीन रिलेशनशिपमध्ये असल्याचे तपासात समोर आले आहे. रिलेशनशिपमध्ये असताना सुकेशने जॅकलीनला अनेक मौल्यवान भेटवस्तू दिल्या होत्या. मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलीनचीही चौकशी करण्यात आली होती. जॅकलीनशिवाय सुकेशने नोरा फतेही हिलादेखील अनेक भेटवस्तूही दिल्या होत्या. यामुळे ईडीने नोराचीही चौकशीही केली होती.
अदर पूनावालाचे सेरेन प्रॉडक्शन करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि धर्मिक एंटरटेनमेंटमध्ये ५० टक्के हिस्सा खरेदी करणार आहेत. हा करार सुमारे एक हजार कोटी रुपयांचा असेल. धर्मा प्रॉडक्शन कंपनीने याबाबत माध्यमांना माहिती दिली होती.
या डीलनंतर करण जोहरची धर्मामध्ये सुमारे ५० टक्के हिस्सेदारी असेल. सध्या करणकडे ९०.७ टक्के आणि त्याची आई हिरू यांच्याकडे ९.२४ टक्के भागिदारी आहे. करारानंतरही करण जोहर कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष राहणार आहे.