संग्रहित छायाचित्र
सध्या चित्रपटगृहात सिनेमे पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड आहे. ‘रॉकस्टार’, ‘लैला मजनू’, ‘रहना है तेरे दिल में’ असे अनेक सिनेमे चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित झाले आहेत; तर आगामी काळात काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. यात सप्टेंबर महिन्यात ‘वीर-झारा’, ‘परदेस’, ‘ताल’ हे सिनेमे पुन्हा प्रदर्शित होणार आहेत. याच ट्रेंडच्या चर्चा असताना ‘शोले’ या एकेकाळी गाजलेल्या सिनेमाच्या स्पेशल शोचे आयोजन मुंबईतील कुलाब्यात असणाऱ्या रिगल सिनेमागृहात करण्यात आले होते. या स्पेशल शोला सलीम खान, जावेद अख्तर आणि या सिनेमाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी हजेरी लावली होती. या सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगनंतर अभिनेते अमिताभ बच्चन यांनी जुने सिनेमे चित्रपटगृहात पुन्हा प्रदर्शित होण्याच्या ट्रेंडवर आपले मत व्यक्त केले आहे.
रविवारी रात्री बिग बी यांनी त्यांच्या ब्लॉगवर ‘संडे दर्शन’चे काही फोटो शेअर केले. यात ते त्यांच्या ‘जलसा’ या घराबाहेर मोठ्या संख्येने आलेल्या चाहत्यांना अभिवादन करताना दिसत आहेत. हा दिग्गज अभिनेता गेल्या ४२ वर्षांपासून दर रविवारी आपल्या घराबाहेर आलेल्या चाहत्यांना भेटण्यासाठी घराबाहेर येतो. अमिताभ बच्चन यांनी काल संध्याकाळचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले, “आना मेरी जान मेरी जान, संडे की संडे आना, मेरी जान मेरी जान संडे की संडे, कुछ पुराने गानों की झलक, जो आज तक झलक रही हैं; और बीती फ़िल्में को भी अब लोग बड़े पर्दे पर देखना चाहते हैं।
बिग बी या ब्लॉगमध्ये असे म्हणतात की, काही जुनी गाणी आजही लोकांच्या ओठी आहेत आणि आता लोकांना जुने सिनेमेसुद्धा मोठ्या पडद्यावर पाहायचे आहेत. मी या आधीही कधी मोबाइलवर सिनेमा पाहायचा विचार केला नव्हता आणि आजही असा विचार करत नाही. कुणास ठाऊक? जुने ते सोने होते की सोने हेच जुने झाले आहे.