संग्रहित छायाचित्र
ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती यांची पहिली पत्नी हेलेना ल्यूक यांचे ३ नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत मर्दमध्ये दिसल्या होत्या.
६८ वर्षीय हेलेना गेली अनेक वर्षे अमेरिकेत राहत होत्या, जिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती प्रसिद्ध नृत्यांगना आणि अभिनेत्री कल्पना अय्यर यांनी एका पोस्टद्वारे शेअर केली. हेलेना अनेक दिवसांपासून आजारी होत्या. याबाबत त्यांनी निष्काळजीपणा दाखवत डॉक्टरकडे जाण्यास नकार दिला होता, असे समोर आले आहे. अ त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही.
हेलेना ल्यूक हे सत्तरीच्या दशकात फॅशन जगतातील एक प्रसिद्ध नाव होते. १९७९ मध्ये त्यांची मिथून चक्रवर्तीसोबत भेट झाली आणि काही काळ रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. हेलेनासोबत लग्न करण्यापूर्वी मिथून काही महिने सारिकासोबत रिलेशनशिपमध्ये होते. हेलेनासोबत लग्न झाले तेव्हा मिथुन स्टार नव्हते. लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यांनी मिथून आणि हेलेनामध्ये भांडणे सुरू झाली. लग्नाच्या चारच महिन्यांनंतर हेलेनाने मिथूनपासून घटस्फोट मागितला.
एका मुलाखतीत हेलेना यांनी लग्न तुटण्याचे कारण सांगितले. ‘‘मिथून सकाळी सहा वाजल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला लग्नासाठी पटवत असे. त्यानंतर आम्ही दोघांनी १९९५ मध्ये गुपचूप लग्न केले. लग्न तुटण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे मिथूनची योगिता बालीशी जवळीक वाढू लागली होती. दुसरीकडे, तो मला एक्स बॉयफ्रेंड जावेद खानबद्दल टोमणे मारायचा. लग्न तुटण्यामागे मिथूनचा चुलत भाऊ हेदेखील एक कारण होते. तो त्याच्या दोन चुलत भाऊ आणि कुत्र्यासोबत घरात राहत होता. लग्नानंतर मीही तिकडे शिफ्ट झाले. त्याचे दोन्ही चुलत भाऊ त्याचे पैसे खर्च करायचे, जे मला अजिबात आवडत नव्हते. जेव्हा मी त्याला दोन चुलत भावांना वेगळे करण्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, ‘तुला जायचे असेल तर जा, ते कुठेही जाणार नाहीत.’ यानंतर आम्ही वेगळे झालो,’’ अशी माहिती त्यांनी मुलाखतीत दिली होती.
मिथूनपासून घटस्फोट घेतल्यानंतर हेलेना यांनी चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. १९८० मध्ये आलेल्या ‘जुदाई’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्या अमिताभसोबत ‘मर्द’ या चित्रपटात दिसल्या होत्या. या चित्रपटात ब्रिटीश राणीची भूमिका साकारल्याने त्यांचे खूप कौतुक झाले. याशिवाय त्यांनी ‘दो गुलाब,’ ‘एक नया रिश्ता,’ ‘साथ साथ’ आणि ‘आओ प्यार करे’ यांसारख्या चित्रपटांत काम केले. ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा हेलेना यांना हिंदी चित्रपटांमध्ये काम मिळणे बंद झाले तेव्हा त्या अमेरिकेत गेल्या. अमेरिकेत राहून त्यांनी डेल्टा एअरलाइन्समध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करायला सुरुवात केली. नंतर त्या अमेरिकेतच स्थायिक झाल्या.