मिलिंद गवळीचा मुलींना मोलाचा सल्ला
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय मालिका म्हणून ‘आई कुठे काय करते’ कडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेत येणाऱ्या ट्वीस्टमुळे ती चांगलीच चर्चेत आहे. मालिकेतील अभिनेते मिलिंद गवळी यांनी मुलींना एक मोलाचा सल्ला दिला आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात मालिकेच्या आगामी भागातील एक व्हीडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. या व्हीडीओला त्यांनी हटके कॅप्शन देत अनेक मुलींना बाप म्हणून मोलाचा सल्ला दिला आहे.
“एका बापाची व्यथा अनिरुद्धच्या माध्यमातून मांडली जात आहे, अनिरुद्ध खूप चुकीचा वागतो आहे, एका चांगल्या कार्यात विघ्न आणतो आहे, असे सगळ्यांनाच वाटणे साहजिक आहे, पण खरेच विचार केला तर अनिरुद्धचे म्हणणे अगदी बरोबर आहे. अनिरुद्ध म्हणतोय जोपर्यंत माझी मुलगी तिच्या पायावर उभी राहात नाही, ती तिचे शिक्षण पूर्ण करत नाही, तिला आयुष्यामध्ये जे करायचं आहे ते स्वप्न ती पूर्ण करत नाही, तोपर्यंत लग्नाच्या बेडीत तिला अडकवायचे नाही.
बाप म्हणून त्याला त्याची मुलगी खूप चांगली माहिती आहे. दोन वेळा ती प्रेमात फसली आहे. आता त्याचा तिच्या या प्रेमावर विश्वास नाही. त्याचे म्हणणे आहे की, साखरपुडा झाल्यानंतर कशावरून यश आणि गौरीसारखा तिचाही साखरपुडा मोडणार नाही, त्याचं म्हणणे आहे की आधी शिक्षण पूर्ण करा, आयुष्यामध्ये स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मगच हा लग्नाचा विचार करा, अनिरुद्ध असेही म्हणतो की, मुलगा पण अजूनही सेटल झालेला नाही. तोही शिकतो आहे. मग एवढी घाई कशासाठी? अनिरुद्ध बाप म्हणून कुठेही चुकत नाही. कदाचित त्याची ही समजावण्याची पद्धत खूप चुकीची आहे. पण ती अनिरुद्धची पद्धत आहे, तो वेगळा वागूच शकत नाही. वेगळ्या पद्धतीने समजावू शकत नाही. पुढचे सीन्स मी शूट केलेले आहेत, जे मला स्वतःला खूप भावले आहेत, पण ते मी तुम्हाला सांगू शकत नाही”, असे मिलिंद गवळींनी म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.