माधुरीलाही 'मधुमास'ची भुरळ
बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित ५६ व्या वर्षीही तिच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घालते. अभिनय कौशल्याने बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या माधुरीचा चाहतावर्गही मोठा आहे. सध्या माधुरी दीक्षित एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. ट्रेंडिंग गाण्यावर रील्स बनवणाऱ्या डान्सिंग क्वीनला मराठी गाण्याची भुरळ पडली आहे.
माधुरी दीक्षितने ‘बहरला हा मधुमास’ या गाण्यावर रील व्हीडीओ तयार केला आहे. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून माधुरीने हा व्हीडीओ शेअर केला आहे. या व्हीडीओमध्ये माधुरी दीक्षित लाल रंगाची साडी नेसून बहरला हा मधुमास गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. या गाण्याच्या काही खास 'स्टेप्स' तिने केल्या आहेत. माधुरी दीक्षितच्या या व्हीडीओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.
‘बहरला हा मधुमास’ गाण्यावरील माधुरी दीक्षितचा रील व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हीडीओवर सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी कमेंट केली आहे. “मनापासून धन्यवाद. माझ्या “महाराष्ट्र शाहीर” या चित्रपटातलं हे गाणे आहे. तुम्ही ते सादर केले याचा मराठी म्हणून विशेष अभिमान आणि आनंद आहे. हा चित्रपट प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे. नक्की पाहा, थोर कलाकार शाहीर साबळे यांना ती मानवंदना ठरेल. जय महाराष्ट्र,” असे केदार शिंदेंनी कमेंटमध्ये म्हटले आहे.
रीलवर ट्रेंडिंग असलेले ‘बहरला हा मधुमास’ हे गाणे ‘महाराष्ट्र शाहीर’ या मराठी चित्रपटातील आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदेंनी केलं असून अंकुश चौधरी व सना शिंदे या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. २८ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला होता. प्रेक्षकांकडूनही या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. २ जूनला ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आला आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.