संग्रहित छायाचित्र
निर्माती आणि दिग्दर्शिका किरण रावचा 'लापता लेडीज' हा सोशल कॉमेडी ड्रामा चित्रपट यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने 'लापता लेडीज'चा ऑस्करमध्ये समावेश करण्याची घोषणा केली आहे.
आमिर खानची माजी पत्नी किरण रावचा हा चित्रपट चालू वर्षी प्रदर्शित झाला होता आणि प्रेक्षकांना खूप आवडला होता. 'लापता लेडीज'ची ऑस्करमध्ये परदेशी भाषा कॅटेगरीसाठी निवड झाली आहे. आता मार्च २०२५ मध्ये ९७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात याची पुढील घोषणा केली जाईल. 'लापता लेडीज' चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत एक-दोन नव्हे तर २८ उत्तम चित्रपटांना मागे टाकत बाजी मारली आहे.
'लापता लेडीज' या चित्रपटाने भारतात यावर्षी प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. यामध्ये रणबीर कपूरचा अॅनिमल, प्रभासचा कल्की 2898 एडी, विक्रमचा तमिळ चित्रपट तंगलान, राजकुमार रावचा श्रीकांत, तामिळ चित्रपट वाझाई आणि मल्याळम चित्रपट उल्लोझुक्कू इत्यादी महत्त्वाच्या चित्रपटांचा समावेश होता.