संग्रहित छायाचित्र
अभिनेता कार्तिक आर्यन बालपणापासून शाहरुख खानचा फॅन होता. किंग खानची एक झल पाहण्यासाठी तो मन्नतच्या बाहेर तासनतास उभा राहायचा, अशी आठवण त्याने नुकतीच एका मुलाखतीत सांगितली.
कार्तिक सध्या ‘भूलभुलैया ३’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. याच्या प्रमोशनचा भाग म्हणून कार्तिकने नुकतीच एक मुलाखत दिली. यात एका प्रश्नाच्या उत्तरात तो म्हणाला, ‘‘सेल्फी देऊन मी जास्तीत जास्त चाहत्यांना खूश करण्याचा प्रयत्न करतो. एकेकाळी मीदेखील अनेक स्टार्सचा फॅन होतो. त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी मी खूप उत्सुक असायचो. त्यामुळे चाहत्यांना भेटणे किती महत्त्वाचे आहे, हे मी समजू शकतो.’’
कार्तिकला विचारण्यात आले की तो कोणाचा चाहता आहे, तेव्हा त्याने उत्तरात शाहरुख खानचे नाव घेतले. ‘‘मी शाहरुख खानचा खूप मोठा चाहता आहे. लहानपणापासून मी त्याच्या प्रेमात आहे. तेव्हा मी त्याला भेटलो नव्हतो, खूप आधी मन्नतच्या समोर गेलो होतो. मी मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा बँडस्टँडवर गेलो होतो. शाहरुख दर रविवारी त्याच्या घरातून निघायचा, मी त्याला त्याच्या कारमधून जाताना पाहिले. आजही रविवारी अनेक लोक त्याला भेटायला येतात,’’ असे तो म्हणाला.