अभिनेत्री करिश्मा कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना मोहून टाकलं आहे. अभिनय क्षेत्रात आता ती सक्रिय नसली तरी सोशल मीडियावर ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. एका प्रश्न-उत्तर सत्रात एका चाहत्याने तिला दुसऱ्या लग्नाबाबत विचारलं. त्यावर करिश्माने उत्तर दिलं, "डिपेंड्स" म्हणजे "निर्भर करतं." करिश्मा सध्या सिंगल मदर म्हणून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करत आहे. मुलांसोबतचे फोटो ती सोशल मीडियावर पोस्ट करते.
करिश्माच्या दुसऱ्या लग्नाबाबत तिचे वडील रणधीर कपूर यांनीही वक्तव्य केलं. त्यांनी सांगितलं की, करिश्माला दुसरं लग्न करायचं असल्यास त्यात काहीच चुकीचं नाही, परंतु सध्या ती दुसऱ्या लग्नाचा विचार करत नाहीये.
करिश्माचे पहिले लग्न 2003 मध्ये दिल्लीतील उद्योजक संजय कपूर यांच्यासोबत झाले होते, परंतु त्यांच्या नात्यात तणाव वाढल्याने 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर करिश्माने पतीवर आणि सासरच्या मंडळींवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. ज्यामध्ये तिला अनेकदा शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागला होता. तिने आपल्या हनीमूनच्या दिवशीही होणाऱ्या वाईट अनुभवाबाबत खुलासा केला होता. ज्यात तिची बोली लावण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.
करिश्मा सध्या आपल्या मुलांसोबत एक आनंदी आयुष्य जगत असून, तिने वैयक्तिक आयुष्यात आलेल्या आव्हानांना समर्थपणे सामोरे जात, एक सशक्त आई म्हणून आपला मार्ग निवडला आहे.