संग्रहित छायाचित्र
कंगना रणौत हिने तयार केलेल्या ‘इमर्जन्सी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात आली. चित्रपटाचे गीतकार मनोज मुंतशीर कंगनाच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
मनोज मुंतशीर यांनी शीख समुदायाच्या लोकांना आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले आहे. मनोज म्हणाले, ‘‘हा चित्रपट केवळ कंगनानेच नाही, तर ५०० जणांच्या क्रूने बनवला आहे. या चित्रपटावर बंदी म्हणजे त्या ५०० जणांच्या कष्टाचा अवमान ठरेल. कृपया, हा अन्याय करण्यात येऊ नये.’’
मनोज यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये ते म्हणतात, ‘‘सेन्सॉर प्रमाणपत्र न मिळाल्याने ‘इमर्जन्सी’ ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार नाही. पण हा सर्टिफिकेटचा खेळ अर्धवट का खेळला जातोय? आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर करणारी माणसे आहोत. ‘इमर्जन्सी’बद्दल काय अडचण आहे? समस्या अशी आहे की इंदिरा गांधींची निर्घृण हत्या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. मग इंदिराजींचा मृत्यू रस्ता अपघातात झाला का? त्यांचा खून झाला नाही का? अडचण अशी आहे की त्याचा मारेकरी शीख असल्याचे दाखवण्यात आले आहे, मग सतवंत सिंग आणि बेअंत शीख नव्हते का?’’
या चित्रपटावर शीख समुदायाचा आक्षेप असल्याचे बोलले जात आहे. 'एक ओंकार सतनाम' म्हणत सत्याच्या पाठीशी निर्भयपणे उभे राहणारे शीख चित्रपटात दाखवलेल्या सत्याला घाबरतात, हे मी मानायला तयार नाही. शीख समाज हा भारताच्या इतिहासातील एक सुवर्णपान आहे. तो डोक्यावर भगवा फेटा घालून बाहेर पडतो, तेव्हा सारा देश त्याच्याकडे आदराने पाहतो. कारण त्या पगडीच्या प्रत्येक पटीत आपल्या महान गुरूंचे शौर्य दिसून येते. सतवंत आणि बेअंतसारख्या नराधमांनी ज्यांच्या रक्षणाची शपथ घेतली त्यांच्या अंगावर गोळ्या झाडल्या. सतवंतसिंग आणि बेअंत यांना कोणी आपले कसे मानू शकेल? १९८४ मध्ये निरपराध शिखांना सतवंत आणि बेअंत यांच्या गुन्ह्यांची किंमत वाईट पद्धतीने चुकवावी लागली. भारताच्या इतिहासात आणीबाणीइतके हे काळे पान आहे, पण शिखांनी कधीही बळीचे भांडवल केले नाही. १९८४ नंतर सीमेवर प्राणांची आहुती देणाऱ्यांची यादी बनवली गेली, तरी शिखांची संख्या कमी भरणार नाही. नाही. अशा धाडसी लोकांना चित्रपटाची भीती वाटावी, यावर मी विश्वास ठेवण्यास नकार देतो, असेही मनोज यांनी नमूद केले.
कंगनाविरुद्ध तुमच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्या कोर्टात न्या, न्याय व्यवस्था त्यावर निर्णय घेईल. पण हा चित्रपट एकट्या कंगनाचा नाही. ५०० जणांच्या चमूने आपला घाम विकून हा चित्रपट बनवला. तुमच्या उपस्थितीत अन्याय होता कामा नये. प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटात काही चुकीचे दाखवण्यात आले आहे असे वाटत असेल तर त्याचा निषेध करा, मीही तुमच्या पाठीशी उभा आहे. तुमच्या माणुसकीवर आणि न्याय प्रेमावर आमचा नेहमीच विश्वास आहे. आम्हांला माहीत आहे की, ज्यांच्या मोठ्या आवाजाने औरंगजेबाच्या कानाचा पडदा फुटायचा ते शीख इतरांचा आवाज दाबण्यासाठी उभे राहू शकत नाहीत. सेन्सॉर बोर्डावर तुमच्या नावाचा दबाव टाकला जात आहे. ते राजकीय आहे, नैतिक नाही. काही भयभीत लोक शीख समाजाचे प्रतिनिधित्व करत नाहीत., याकडेही मनोज यांनी लक्ष वेधले.
कंगनाने हा चित्रपट कोणताही कट न करता रिलीज करण्याचा निर्धार व्यक्त केला. हा चित्रपट ६ सप्टेंबरला प्रदर्शित होणार होता, मात्र याला विरोध होत आहे. याचिका दाखल केल्या आहेत. या सर्व कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यावरून वादग्रस्त दृश्य हटवण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत.