File Photo
अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या दिग्दर्शित 'इमर्जन्सी' या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यामुळे चर्चेत आहे. दरम्यान, तिने 'भारत भाग्य विधाता' या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे.
पडद्यामागे कठोर परिश्रम करणाऱ्या कामगार वर्गाच्या नायकांच्या योगदानाची कथा हा चित्रपट सांगणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गीतकार आणि पटकथा लेखक मनोज तापडिया करणार आहेत, ज्यांनी यापूर्वी 'चीनी कम', 'माई', 'मद्रास कॅफे' आणि 'एनएच १०' सारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट युनोया फिल्म्सच्या बबिता आशिवाल आणि फ्लोटिंग रॉक्स एंटरटेनमेंटच्या आदि शर्मा यांनी संयुक्तपणे तयार करतील. यात कंगना मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून या चित्रपटाची घोषणा केली आहे. अभिनेत्रीने लिहिले, ‘‘वास्तविक जीवनातील वीरतेची जादू पडद्यावर पाहण्यासाठी सज्ज व्हा. या चित्रपटाची घोषणा करण्यास उत्सुक आहे.’’
'इमर्जन्सी' चित्रपटावर बंदी असताना कंगनाने या नव्या चित्रपटाची घोषणा केली तेव्हा अनेक यूजर्सने तिची खिल्ली उडवली. काही यूजर्सनी रिलीज होण्यापूर्वीच याला फ्लॉप म्हटले तर काहींनी ‘‘तुमचे चित्रपट रिलीज होत नाहीत, मग तुम्ही ते का बनवता,’’ असा प्रश्न विचारला.
यापूर्वी, कंगनाने दिग्दर्शित केलेला 'इमर्जन्सी' हा चित्रपट ६ सप्टेंबरला रिलीज होणार होता पण त्याला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून मंजुरी मिळाली नाही. या चित्रपटात कंगना देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
अनेक शीख धार्मिक संघटनांनी या चित्रपटावर टीका करत याविरोधात निदर्शने केली. या संघटनांचा दावा आहे की हा चित्रपट जातीय तणाव निर्माण करू शकतो आणि चुकीची माहिती पसरवू शकतो. या सर्व कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. त्यावरून वादग्रस्त दृश्य हटवण्याचे आदेश सेन्सॉर बोर्डाने दिले आहेत. याबाबत कंगनाने म्हटले आहे की, ती तिच्या 'इमर्जन्सी' चित्रपटासाठी कोर्टात लढणार आहे आणि कोणताही कट न करता तो रिलीज करणार आहे, कारण तिला तथ्य बदलायचे नाही.