File Photo
आलिया भट्ट सध्या तिच्या ‘जिगरा’ चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. ११ ऑक्टोबरला हा बहुचर्चित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाची निर्मितीही आलियाने स्वत: केली आहे. नुकतेच या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आले. या सिनेमाने पहिल्या दिवशी साडेचार कोटी रुपयांची कमाई केल्याचे जाहीर करण्यात आले.
यावरुनच अभिनेत्री दिव्या खोसलाने खोटे बॉक्स ऑफिस कलेक्शन शेअर केल्याचा दावा केला आहे. दिव्याने इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली. त्यात तिने रिकाम्या थिएटरचा फोटो पोस्ट केला असून आलियाच्या जिगरा सिनेमाचा शो सुरु असल्याचे दिसत आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, मी सिटी मॉलमधील पीव्हीआर सिनेमागृहामध्ये जिगरा सिनेमाचे तिकीट बुक केले. थिएटर पूर्ण रिकामे होते आणि याचप्रमाणे सगळे थिएटर्स रिकामे आहेत. आलिया भट्टमध्ये खरेच जिगरा आहे जिने स्वतःच तिकीटे खरेदी करून खोटे कलेक्शन जाहीर केले आहे. मला प्रश्न पडला आहे ही पैसे घेऊन काम करणारी मीडिया शांत का आहे?
आलिया भट्टचा जिगरा हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच चर्चेत आहे. नुकतेच कंगना रणौतने आलिया भट्टला चित्रपटाच्या थंड ओपनिंगबद्दल अप्रत्यक्ष टोला लगावला आणि आता दिव्या खोसलाने एका पोस्टद्वारे थेट आलिया भटवर निशाणा साधला आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अद्याप काही खास कमाई करता आलेली नाही. प्रेक्षकांनी आलिया भट आणि वेदांग रैना स्टारर या चित्रपटाकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
feedback@civicmirror.in