संग्रहित छायाचित्र
नेटफ्लिक्सवर प्रसिद्ध झालेली ‘आयसी ८१४ - द कंदहार हायजॅक’ ही सिरीज चांगलीच वादात सापडली आहे. यामध्ये दहशतवाद्यांची नावे हिंदू आहेत. ही नावे वस्तुस्थितीला धरून सल्याचे सांगत अनेक स्तरावरून यावर आक्षेप घेण्यात आले. त्याची दखल घेत अखेर नेटफ्लिक्सने या सिरीजचा कंटेंट तपासण्याचा निर्णय घेतला आहे.
नेटफ्लिक्सच्या इंडिया कंटेंट हेड मोनिका शेरगिल यांनी मंगळवारी (दि. ३) माहिती आणि प्रसारण मंत्रालयासमोर ही हमी दिली. ‘द कंदहार हायजॅक’मध्ये दहशतवाद्यांच्या हिंदू नावांवरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद इतका पेटला की सिरीजवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. यानंतर मंत्रालयाने मोनिका यांना उत्तर देण्यासाठी बोलावले होते. मोनिका यांनी मंत्रालयाला आश्वासन दिले की, ‘‘आम्ही मालिकेतील मजकुराचे पुनरावलोकन करू. भविष्यातही नेटफ्लिक्सवर कंटेंट आणताना देशाच्या भावना लक्षात ठेवल्या जातील, अशी हमी आम्ही देतो.’’
देशातील लोकांच्या भावना दुखावण्याचा कोणालाही अधिकार नाही. भारताच्या संस्कृतीचा आणि सभ्यतेचा आदर नेहमीच सर्वोपरी आहे. तुम्ही काहीही चुकीचे दाखवण्यापूर्वी विचार केला पाहिजे. सरकार याच्या विरोधात आहे, अशा स्पष्ट शब्दांत सरकारने मोनिका यांना समज दिली.
‘द कंदहार हायजॅक’ ही मालिका २९ ऑगस्ट रोजी रिलीज झाली आहे, ती कंदहार विमान अपहरणावर आधारित आहे. यामध्ये भोला आणि शंकर अशी दहशतवाद्यांची नावे आहेत. यावरून वाद निर्माण झाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिकाद्वारे या मालिकेवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली. याचिकाकर्त्याने चित्रपट निर्मात्यावर वस्तुस्थितीचा विपर्यास केल्याचा आरोप केला आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष सुरजितसिंह यादव यांनी ही याचिका दाखल केली आहे. ‘‘मालिकेत दहशतवाद्यांची हिंदू नावे दाखवण्यात आली आहेत, अपहरण करणाऱ्या दहशतवाद्यांची नावे इब्राहिम अख्तर, शाहिद अख्तर, सनी अहमद, जहूर मिस्त्री आणि शाकीर अशी आहेत, मात्र वेब सीरिजमध्ये त्यांची नावे बदलून भोला, शंकर, चीफ, डॉक्टर आणि बर्गर अशी ठेवण्यात आली आहेत. यामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत,’’ असे याचिकेत म्हटले आहे.
या मालिकेची कथा २४ डिसेंबर १९९९ च्या सत्य घटनेवर आधारित आहे. काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नवी दिल्लीला जात असताना पाच दहशतवाद्यांनी इंडियन एअरलाइन्सच्या ‘आयसी - ८१४’ या विमानाचे अपहरण केले. ज्यामध्ये १७६ प्रवासी प्रवास करत होते.
दहशतवादी हे विमान अमृतसर, लाहोर, दुबईमार्गे कंदहारला घेऊन जातात. प्रवाशांना सात दिवस ओलीस ठेवले होते. या काळात विमानातील प्रवाशांची काय स्थिती असेल? त्यांच्या कुटुंबीयांचे काय होणार? या प्रवाशांना सोडण्यासाठी सरकारपुढे कोणत्या अटी ठेवल्या आहेत? हे सर्व या मालिकेत दाखवले आहे.
या मालिकेची कथा ज्येष्ठ पत्रकार श्रींजय चौधरी आणि देवी शरण यांच्या 'फ्लाइट इन टू फियर - द कॅप्टन्स स्टोरी' या पुस्तकातून घेण्यात आली आहे. या मालिकेचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा आहेत. नसीरुद्दीन शाह, पंकज कपूर, विजय वर्मा, दिया मिर्झा, पत्रलेखा, अरविंद स्वामी आणि कुमुद मिश्रा यांनी या सहा भागांच्या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या आहेत.