संग्रहित छायाचित्र
बॉबी देओलला (Bobby Deol) गेल्या वर्षी 'ॲनिमल' चित्रपटातून जबरदस्त यश मिळाले. तेव्हापासून तो पूर्वी कधी नव्हे इतका चर्चेत असतो. त्याने कारकिर्दीत अनेक कमालीचे चढ-उतार अनुभवले आहेत. आपल्या वाईट काळातील आठवणी सांगताना त्यावेळी मला स्वत:चीच दया यायची, असे सांगितले.
देओल फॅमिलीचा (Deol Family) सदस्य असल्याने त्याच्याकडे आधीपासूनच मीडियाचे लक्ष होते. प्रारंभीचे काही चित्रपट हिट झाल्यानंतर दीर्घकाळ त्याचे अनेक चित्रपट फ्लाॅप ठरले. यादरम्यान आयुष्यातील दीर्घ संघर्ष त्याने पाहिला. त्यावेळी बॉबीला दारूचे व्यसन जडले होते.
एका मुलाखतीत बॉबीने आपल्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्प्याबद्दल बोलताना सांगितले की, ‘‘तुम्ही केलेल्या चुकीबद्दल आता पश्चात्ताप करू शकत नाही. पण चुकांमधून तुम्ही कसे शिकणार? मला स्वतःचीच दया वाटू लागली होती. एखाद्या व्यक्तीसाठी स्वतःबद्दल वाईट वाटण्यापेक्षा वाईट काहीही नाही. स्वत:बद्दलची ही भावना दीर्घकाळ मी अनुभवली आहे.’’
प्रत्येकाला अस्थिरता जाणवते आणि या भावनेवर मात करणे खूप कठीण असते. असे वाटायचे की आपण बुडत आहोत. त्यावेळी माझ्या कुटुंबीयांना माझी खूप काळजी होती. ते मला नेहमी प्रोत्साहन द्यायचे पण जेव्हा मी असा वागत असे तेव्हा मला त्यांच्या डोळ्यांत दिसायचे की त्यांना किती वेदना होत होत्या, असे सांगताना बाॅबी कमालीचा हळवा झाला होता.
२०१४ ते २०१६ हा तो काळ होता जेव्हा काम न मिळाल्याने निराश झालेल्या बॉबीने हायप्रोफाइल नाईटक्लब आणि पबमध्ये डीजे म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी बॉबीच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात झाली. १०७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘धरम-वीर’ या चित्रपटात तो बालकलाकार होता. १९९५ मध्ये, त्याने 'बरसात' चित्रपटाद्वारे नायक म्हणून पदार्पण केले ज्यामध्ये त्याच्यासोबत ट्विंकल खन्ना होती.
'बरसात' चित्रपटानंतर बॉबीचे 'गुप्त' (१९९७), 'सोल्जर' (१९९८) आणि 'बादल' (२०००) हिट ठरले. असे असूनही बॉबीला विशेष चित्रपट मिळाले नाहीत. 'किस्मत', 'बरदाश्त', 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों', 'झूम बराबर झूम', 'नन्हे जैसलमेर', 'पोस्टर बॉईज' असे काही चित्रपट केले पण ते सगळे फ्लॉप ठरले. त्याला छोट्या छोट्या भूमिका मिळू लागल्या. २०११मध्ये त्याने 'यमला पगला दीवाना' या चित्रपटात काम केले होते, पण या मल्टीस्टारर चित्रपटाचा बॉबीच्या करिअरला फारसा फायदा झाला नाही.
बॉबीने आपल्या २८ वर्षांच्या कारकिर्दीत सुमारे ४५ चित्रपट केले. परंतु एवढ्या मोठ्या करिअरमध्ये 'अॅनिमल' हा एकमेव चित्रपट आहे जो ब्लॉकबस्टर ठरला. याआधी त्याचे फक्त सहा चित्रपट हिट झाले होते. हे 'बरसात', 'गुप्त', 'सोल्जर', 'बादल', 'यमला पगला दीवाना' आणि 'हाऊसफुल ४' आहेत.