संग्रहित छायाचित्र
मराठी सिनेस्टार सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी स्टारकास्ट लवकरच प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. 'बोल बोल राणी' या नव्या कोऱ्या सिनेमाच्या माध्यमातून हे तिगडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ७ फेब्रुवारी २०२५ रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. नुकतेच सिनेमाचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे. सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे, सई ताम्हणकर, चिन्मय मांडलेकर हे तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आले आहेत. सिड विंचुरकर दिग्दर्शित या सिनेमाचे अपूर्वा मोतीवाले सहाय, सिड विंचुरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत.
मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय दर्जेदार,आशयपूर्ण सिनेमे देऊन मराठी सिनेमाला जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यामुळेच परदेशातूनही अनेक प्रॉडक्शन्स हाऊस मराठी चित्रपटांची निर्मिती करण्यास उत्सुक आहेत. म्हणूनच न्यूझीलंड मोशन पिक्चर्सचे सिड विंचुरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज झाले आहेत. सई ताम्हणकर म्हणाली, माझ्या कौशल्याचा कस लागणारी ही भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली. काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या. पण खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ही आव्हाने उत्तमरित्या पेलली. अपूर्वा आणि मी 'दुनियादारी'पासून एकत्र आहोत आणि ती एक उत्तम एडिटर आहे. हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे. तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी, असे मला वाटते. सिडबरोबर मी पहिल्यांदाच काम करतेय. भविष्यातही त्याच्यासोबत काम करेन, अशी आशा आहे. कारण मला त्याच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे. भूमिका, चित्रपटाबाबत जास्त काही बोलणार नाही, पण माझा कस लागला होता.