File Photo
‘मृगया’, ‘सुरक्षा’, ‘डिस्को डान्सर’ आणि ‘डान्स डान्स’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करणारे अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. याच वर्षी जानेवारी महिन्यात भारत सरकारने मिथुन यांना 'पद्मभूषण' या तिसऱ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने सन्मानित केले होते.
केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी ट्विटरवर ही घोषणा केली. ‘मिथुन दा यांचा विलक्षण सिनेप्रवास अनेक पिढ्यांना प्रेरणा देतो. दादासाहेब फाळके निवड समितीने ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर करताना अभिमान वाटतो. या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मिथुन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल, अशी घोषणा माहिती व प्रसारणमंत्र्यांनी केली.
पुरस्काराच्या घोषणेचे हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मिथुन यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, फूटपाथवरील मुलाला एवढा मोठा सन्मान मिळेल याची कधी कल्पनाही केली नव्हती. मी एवढेच सांगू शकतो की, मी हा पुरस्कार माझ्या कुटुंबाला आणि जगभरातील माझ्या सर्व चाहत्यांना समर्पित करतो. कोलकात्याच्या एका गल्लीतून मी जिथून आलो आहे, तिथल्या फूटपाथवरील मुलाला एवढा मोठा सन्मान मिळेल, याची मी कल्पनाही केली नव्हती.
७४ वर्षीय मिथुन यांनी १९७६ मध्ये मृणाल सेन यांच्या 'मृगया' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. त्यांच्या १९८२ साली प्रदर्शित झालेल्या ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने भारत आणि सोव्हिएत युनियनमध्ये बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवले. १९९० मध्ये 'अग्निपथ' या चित्रपटातील अभिनयामुळे त्यांना सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
त्यानंतर त्यांनी ‘कसम पैदा करने वाले की’ आणि ‘कमांडो’सारख्या चित्रपटांमध्ये काम केले. मिथुन यांनी २०१४ मध्ये राज्यसभेचे खासदार म्हणूनही काही काळ राजकीय कारकीर्द गाजवली. मिथुन चक्रवर्ती यांनी ‘डान्स ज्युनिअर’ आणि ‘हुनरबाज : देश की शान’ यांसारख्या शोचे परीक्षक म्हणून टेलिव्हिजनवरही पाऊल ठेवले. अलीकडेच त्यांनी विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात काम केले होते.