राहुल देशपांडे यांच्या नावाने टेलिग्रामवर फसवणूक
राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. राहुल सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतात. ते नेहमी त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात काय नवीन सुरू आहे याची माहिती चाहत्यांबरोबर शेअर करत असतात, पण आता त्यांनी एक पोस्ट शेअर करत त्यांच्या चाहत्यांना सतर्क केलं आहे.
गेले काही दिवस राहुल यांचे नाव वापरून त्यांच्या चाहत्यांकडून बँक अकाउंटची आणि त्यांची खासगी माहिती घेऊन काही जण त्याचा गैरवापर करत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करत राहुल यांनी त्यांच्या चाहत्यांना फसवणूक होण्यापासून सावध केले आहे.
राहुल यांनी शनिवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, “भारताचा एक जबाबदार नागरिक म्हणून मला तुम्हाला टेलिग्रामवर माझे नाव वापरून होत असलेल्या घोटाळ्याबद्दल जागरूक करायचे आहे. टेलिग्रामवर राहुल देशपांडेकडून चाहत्यांना भेटवस्तू दिल्या जात आहेत, असे सांगत लोकांकडून त्यांच्या बँक अकाउंटची माहिती आणि त्यांची वैयक्तिक माहिती घेतली जात आहे. मला तुम्हाला सांगायचं आहे की, माझे टेलिग्रामवर कुठलेही अकाऊंट नाही. मी तुम्हाला विनंती करतो की, या प्रकारची फसवणूक होण्यापासून सावध राहा.”
राहुल यांची ही पोस्ट खूप चर्चेत आली असून, यावर प्रतिक्रिया देत त्यांचे चाहते याबद्दलचा त्यांना आलेला अनुभव शेअर करत आहेत. अनेकांनी याबद्दल काळजी व्यक्त केली आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.