ब्रिटीश रॉक बँड ‘कोल्डप्ले’ला ईडीचा दणका

पंजाबी पॉप गायक दिलजित दोसांझ आणि ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले यांच्या आगामी कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पाच राज्यांतील १३ ठिकाणी छापे टाकले.

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पंजाबी पॉप गायक दिलजित दोसांझ आणि ब्रिटीश रॉक बँड कोल्डप्ले यांच्या आगामी कॉन्सर्टच्या तिकिटांचा काळाबाजार केल्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने पाच राज्यांतील १३ ठिकाणी छापे टाकले. या प्रकरणी तपास यंत्रणेने मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला.

ईडीने सांगितले की, ‘‘दिल्ली, महाराष्ट्र, राजस्थान, कर्नाटक आणि पंजाबमध्ये १३ ठिकाणी याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. त्याचा तपास केल्यानंतर एजन्सीने मनी लाँड्रिंग कायद्याच्या विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. छापेमारीत ईडीने मोबाईल फोन, लॅपटॉप आणि सिमकार्ड जप्त केले.

२६ आणि २७ ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जवाहरलाल स्टेडियमवर गायक दिलजीतचा कॉन्सर्ट झाला.  तर कोल्डप्ले कॉन्सर्ट नवी मुंबईत पुढील वर्षी जानेवारीमध्ये होणार आहे. या शोच्या तिकिटांची विक्री वेगाने सुरू झाल्याचा आरोप आहे. अनेक चाहत्यांना तिकिटे बनावट आढळली. अनेकांना अनेक पटींनी ब्लॅकमध्ये तिकिटे विकण्यात आली. फसवणुकीची प्रकरणे उघडकीस आल्यानंतर दहाहून अधिक राज्यांमध्ये एफआयआर नोंदवण्यात आले.

बुक माय शो ॲपनेही २ ऑक्टोबरला याप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. यामध्ये इन्स्टाग्राम आणि बनावट वेबसाईटच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे चढ्या दराने तिकीट विक्री करणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीने तपास सुरू केला.

तपास यंत्रणा आता अशा बेकायदेशीर कामांमधून किती उत्पन्न मिळत आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. साधारणपणे, अशा कॉन्सर्टची तिकिटे झोमॅटो, बुक माय शो आणि इतर ॲप्स आणि प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असतात. मात्र, शोची मागणी जास्त असताना ही तिकिटे लवकर विकली जातात आणि मग काळाबाजार करणाऱ्यांचे फावते. इन्स्टाग्राम, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामच्या माध्यमातून या तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांचा ईडी शोध घेत आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story