File Photo
बिपाशा बसूने २००१ मध्ये ‘अजनबी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. करिअरच्या सुरुवातीच्या काळात बिपाशाचा खरा आवाज चित्रपटांमध्ये वापरला गेला नाही. डबिंग आर्टिस्ट मोना घोष यांनी त्यांच्या ‘राज,’ ‘गुनाह,’ ‘जिस्म’ या चित्रपटांमध्ये डबिंग केले. तिच्या आवाजातील बदलामुळे नाराज झालेल्या बिपाशा बसूने एकदा मोना घोषला धमकी दिली होती.
अलीकडेच, द मोटर माउथच्या पॉडकास्टमध्ये, मोनाने सांगितले की, बिपाशा बसूने तिच्यासाठी आवाज डब केला हे जाणून तिला आनंद झाला नाही. संभाषणात तिला विचारण्यात आले की ज्या अभिनेत्रींसाठी तिने आवाज दिला होता त्यांच्याकडून तिला कोणत्या प्रकारची प्रतिक्रिया मिळाली. यावर मोना म्हणाली, काही जण म्हणायचे की आम्हाला समजत नाही, तू हे कसं करतेस, तर काही जण म्हणायचे की तू पुन्हा माझ्यासाठी आवाज डब केलास तर मी तुला मारून टाकेन. जेव्हा तिला विचारण्यात आले की ती अभिनेत्री कोण आहे. तर उत्तर होते, बिपाशा बसू.
मोना घोष पुढे म्हणाली, कदाचित तिला हे समजले नसेल की कोणासाठी आवाज डब करायचा हा माझा निर्णय नाही. मी लोकांकडे जाऊन म्हणत नाही की मला बिपाशासाठी डब करायचे आहे. कोणी माझ्याकडे येऊन विनंती केली तर हा माझा व्यवसाय आहे. मी का नकार देईन?
संभाषणात मोनाने असेही सांगितले की, तिने ‘गुलाम’ चित्रपटात राणी मुखर्जीच्या भूमिकेला आवाज दिला होता, जरी तिला ते अजिबात आवडले नाही. ती म्हणाली, ‘‘राणी मुखर्जी आजही प्रत्येक मुलाखतीत म्हणते की तिला त्या आवाजाचा तिरस्कार आहे. पण हा त्यांचा दोष नाही. आपल्याला स्वतःच्या आवाजाची सवय होते. अशा परिस्थितीत आपण आपल्या चेहऱ्यावर दुसरा आवाज स्वीकारू शकत नाही. इतर कोणताही आवाज आपल्या चेहऱ्यावर लादला तर आपल्याला विचित्र वाटेल.’’
मोनाने अनेक अभिनेत्रींना आवाज दिला आहे. ती ‘ओम शांती ओम’ चित्रपटात दीपिका पदुकोन, ‘कहो ना प्यार है ’ मधील अमिषा आणि ‘राजनीती’मध्ये कॅटरिना कैफचा आवाज बनली आहे.