संग्रहित छायाचित्र
सध्या भारतीय सिनेसृष्टीत एखादी अभिनेत्री आली, प्रेक्षकांना आवडली की तिला सोशल मीडियावर ‘नॅशनल क्रश’ म्हणून घोषित केले जाते. दिशा पटाणी, रश्मिका मंदाना आणि आता तृप्ती डिमरी या ‘नॅशनल क्रश’ झाल्या. मात्र, २००० च्या दशकात ‘नॅशनल क्रश’ ही संकल्पना नसतानाही अनेकांना आवडणारी अभिनेत्री म्हणजे ‘मोहब्बतें’ फेम प्रीती झांगियानी. आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या प्रीती झांगियानीला आजही चित्रपट प्रेमी विसरलेले नाहीत.
दिग्दर्शक आदित्य चोप्रांचा ‘मोहब्बतें’ (२०००) हा सर्वात मोठा हिट ठरला. शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने प्रीतीला मोठी ओळख दिली. या सिनेमात तिची भूमिका अनेक सपोर्टिंग कॅरेक्टर्समधील (सहायक पात्र) एक होती, तरीही तिने प्रेक्षकांवर प्रभावी छाप सोडली आणि तिच्या करिअरला चालना मिळाली.
अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच्या आठवणी सांगताना ती म्हणाली की, सुरुवातीला ती थोडी घाबरलेली होती. कॅमेऱ्यासमोर मी नेहमी आत्मविश्वासपूर्ण असायचे, पण कॅमेऱ्याच्या मागे मी खूप लाजाळू आणि अंतर्मुख होते; ते माझ्यासाठी कठीण होते. ‘मोहब्बते’चे शूटिंग फिल्म सि टीमध्ये होत होते आणि खूप थंडी होती. एके दिवशी अमिताभ बच्चन यांनी मला त्यांची शाल दिली आणि म्हणाले की ती शाल अंगावर घे, पण मी घाबरून म्हटले, नाही नाही, मी हे घेऊ शकत नाही.’ त्यावर यशजी (यश चोप्रा) म्हणाले, ‘अग, अमिताभ बच्चनने मला ती शाल दिली असती तर मी ती घरी नेली असती आणि कधीच परत दिली नसती.’ आजही मला त्याचा खूप पश्चाताप होतो, असे तिने सांगितले.