अखेर माघार!
ओम राऊतने दिग्दर्शन केलेल्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर त्यातील संवाद आणि व्हीएफएक्सची जोरदार चर्चा आहे. चित्रपटात हनुमानाच्या तोंडी असलेल्या संवादांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. रामायणातील हनुमान अशी भाषा कधी तरी बोलेल का, असा प्रश्न नेटकरी विचारत आहेत. टोकाच्या प्रतिक्रियेनंतर चित्रपटाचे संवाद लेखक मनोज मुंतशीर यांनी अखेर माघार घेतली आहे. चित्रपटातील नापसंतीचे संवाद काढून टाकले जातील असा खुलासा त्यांनी केला आहे. ‘आदिपुरुषला होणारा प्रचंड विरोध पाहता मनोज मुंतशीर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसमोर आपली बाजू मांडली आहे. चाहत्यांची मनं दुखावणारे किंवा त्यांच्या भावना दुखावणारे सर्व संवाद लवकरच बदलले जातील, अशी ग्वाही मनोज यांनी ट्वीट करत चाहत्यांना दिली आहे.
मनोज मुंतशीर यांनी या चित्रपटात ४ हजारहून अधिक संवाद लिहिले आहेत. मात्र त्यांनी लिहिलेल्या काही संवादांवर प्रेक्षकांचा आक्षेप आहे.
मनोज यांची ओळख राष्ट्रवादी विचारधारेचे लेखक अशी आहे. या चित्रपटामुळे त्यांच्या प्रतिमेला धक्का लागला असून चाहतेही नाराज झाले आहेत. ‘आदिपुरुष’ मध्ये प्रभास, क्रीती सेनॉन, सैफ अली खान आणि देवदत्त नागे मुख्य भूमिकेत आहेत. ‘आदिपुरुष’ च्या मुंबईतील एका विशेष शो मध्ये
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान यानेही हजेरी लावली होती. इब्राहिम हा नेहमी चर्चेत असतो. इब्राहिमने अजून बॉलिवूडमध्ये एंट्री केली नसली तरी वडील सैफ अली खान आणि त्याची बहीण सारा अली खान यांच्यामुळे त्याच्याबद्दल जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. आदिपुरुषवेळी इब्राहिमचा लूक आणि त्याच्या कपड्यांच्या किमतीमुळे पुन्हा तो चर्चेत आला आहे. इब्राहिमचा एक व्हीडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. व्हीडीओत इब्राहिम गाडीतून उतरून चित्रपटगृहात जाताना दिसत आहे. परंतु यावेळी त्याने घातलेली हूडी सर्वांसाठी चर्चेचा विषय बनली आहे.
काळ्या रंगाच्या हूडीवर उजव्या बाजूला एक लाल रंगाचा क्रॉस आहे. या हूडीची किंमत थोडी थोडकी नाही तर तब्बल दोन लाख रुपये आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.