अवंतिकाची बॉलिवूड एंट्री!
बॉलिवूडची एकेकाळची लोकप्रिय अभिनेत्री भाग्यश्रीची लेक अवंतिका दसानी आता अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 'मिथ्या' ही वेब सीरिज आणि 'नेनू स्टुडंट सर!' या दाक्षिणात्य चित्रपटानंतर ती बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. आगामी 'यू शेप की गली' या चित्रपटात ती शब्बो ही भूमिका साकारत आहे.आपल्या पदार्पणाबद्दल एका मुलाखतीत अवंतिकाने मनमोकळी माहिती दिली आहे. ती म्हणते की, मी आतापर्यंत तीन प्रोजेक्ट केले आहेत. त्याचे शूटिंग हैदराबाद, दार्जिलिंग आणि लखनौला झाले. लखनौमध्ये 'यू शेप की गली'चे शूटिंग करताना मजा आली. तेथे एक महिना शूटिंग झाले असून फक्त पॅचवर्क शिल्लक आहे. विवान शाह, जावेद जाफरी, इश्तियाक खान, नमिता लाल, सुशांत सिंह या प्रत्येकाची स्टाईल वेगळी आहे.
कोणत्याही भूमिकेत सहजतेने कसे शिरायचे हे जावेद सरांकडून शिकले. जावेद सर जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा त्यांची संपूर्ण देहबोली बदलते.
हा एक रोमँटिक, म्युझिकल आणि सोशल ड्रामा असा चित्रपट आहे. माझ्या पात्राचे नाव शबनम आहे. लोक तिला प्रेमाने शब्बो म्हणतात. मला हे पात्र खूप रंजक वाटले. मी 'मिथ्या' मध्ये साकारलेल्या ग्रे शेड रियापेक्षा शब्बोचे पात्र पूर्णपणे वेगळे आहे. हा माझा पहिला बॉलिवूड चित्रपट. शब्बो ही बबली टाईपची नसून एक स्ट्राँग माइंडेड मुलगी आहे. मी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट बघत आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीला मला एवढा छान अनुभव मिळाला याचा मला आनंद आहे.
अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी डान्स, व्हॉइस ट्रेनिंग, बॉक्सिंग, मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगून ती म्हणते की, मी अभिनयाचे अनेक वर्कशॉप केले आहेत. अतुल मोंगिया, हेमंत खेर यांच्यापासून ते केरळमधील आदिशक्ती थिएटर वर्कशॉपपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणाहून अभिनयाचे धडे गिरवले. शक्य तितके मी सातत्य ठेवून शिकते. सेटवर जे शिकायला मिळतं ते कुठेच मिळत नाही. मी भाग्यवान आहे की, 'मिथ्या' मध्ये हुमा कुरैशी, परमब्रता, रजत कपूर यांच्यासोबत काम करायला मिळाले. मी आणि माझा मोठा भाऊ जेव्हा वर्कशॉपसाठी जायचो, तेव्हा आमच्यापेक्षा आईच जास्त उत्साहित असायची. त्यांच्या काळात वर्कशॉप ही संकल्पना नव्हती. घरी पोहोचताच ती सविस्तर माहिती विचारायची. तिने आम्हाला भावनांवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले आहे. भावना डोळ्यांतून दिसत नसेल तर अभिनयाला काही अर्थ नसतो, असे तिचे म्हणणे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.