File Photo
सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पूनावाला यांचे सेरेन प्रॉडक्शन हे करण जोहर यांच्या धर्मा प्रॉडक्शन आणि धर्मिक एंटरटेनमेंटमध्ये ५० टक्के हिस्सा घेणार आहे. हा करार एक हजार कोटी रुपयांचा असेल.धर्मा प्रॉडक्शनने सोमवारी (दि. २१) कंपनीने याबाबत माहिती दिली. या डीलनंतर करण जोहरची धर्मा प्रॉडक्शनमध्ये ५० टक्के हिस्सेदारी कायम असेल. सध्या करण जोहरकडे धर्माची ९०.७ टक्के आणि आई हिरू यांच्याकडे ९.२४ टक्के हिस्सा आहे. करारानंतरही करण जोहर कंपनीचा कार्यकारी अध्यक्ष राहणार आहे. अपूर्व मेहतादेखील सीईओपदी राहतील.
भारताच्या वेगाने बदलणाऱ्या मनोरंजन उद्योगात प्रगत तंत्रज्ञान आणि उत्पादनपद्धती एकत्रित करून कंटेंट निर्मिती, वितरण आणि ऑडियन्सला चांगले पर्याय देणे हे या सहकार्याचे उद्दिष्ट आहे. पूनावाला यांच्या गुंतवणुकीमुळे धर्मा आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल. आमच्या भागिदारीमुळे धर्मा प्रॉडक्शनचा वारसा नव्या उंचीवर पोहोचेल, असे करण म्हणाला. करण पुढे म्हणाला, ‘‘धर्मा हा नेहमीच हृदयस्पर्शी कथांसाठी ओळखला जातो. अदर माझा जवळचा मित्र आहे. तो कायम दूरदर्शीपणे विचार करत असतो. ही त्याची खासियत आहे. आम्ही एकत्र आल्याचा आनंद विशेष आहे. आम्ही दोघेही धर्माचा वारसा नवीन उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहोत.’’
‘‘माझा मित्र करण जोहरसोबत आपल्या देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रॉडक्शन हाऊसमध्ये भागीदारी करताना मला आनंद होत आहे. आम्हाला आशा आहे की येत्या काही वर्षांत आणखी उंची गाठू,’’ असा विश्वास अदर पूनावाला यांनी यावेळी व्यक्त केला.धर्मा प्रॉडक्शनची स्थापना १९७६ मध्ये यश जोहर यांनी केली होती. करण जोहरच्या नेतृत्वाखाली हे प्रॉडक्शन बॉलिवूडमध्ये एक पॉवरहाऊस बनले आहे. या प्रॉडक्शनने ‘कभी खुशी कभी गम,’ ‘ये जवानी है दिवानी’ आणि ‘टू स्टेट्स’ यांसारख्या ब्लॉकबस्टरसह पन्नासहून अधिक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
कंपनी आलिया भट्ट आणि वरुण धवनसह अनेक फिल्मी कुटुंबातील तरुण कलाकारांना लॉन्च करण्यासाठी देखील ओळखली जाते. २०१८ मध्ये धर्मा एंटरटेन्मेंटसह डिजिटल कंटेंटमध्ये त्यांचा विस्तार झाला. नेटफ्लिक्स, ॲमेझाॅनसारख्या प्लॅटफॉर्मसाठी शो केले.धर्मा प्रॉडक्शनचा महसूल वार्षिक मोठ्या प्रमाणात वाढून आर्थिक वर्ष २०२३ मध्ये १,०४० कोटी रुपये झाला. एक वर्षापूर्वी म्हणजेच आर्थिक वर्ष २०२२ मध्ये या प्रॉडक्शन हाऊसचा महसूल २७६ कोटी रुपये होता.
२०२३ मध्ये कंपनीच्या एकूण कमाईमध्ये वितरण अधिकारांमधून ६५६ कोटी, डिजिटलमधून १४० कोटी, सॅटेलाइट हक्कांमधून ८३ कोटी आणि संगीतातून ७५ कोटी रुपये कमाईचा समावेश आहे. तथापि, खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीचा निव्वळ नफा ५९ टक्क्यांनी घटून ११ कोटी रुपयांवर आला आहे. कंपनीने आर्थिक वर्षात आपल्या गरजांवर १,०२८ कोटी रुपये खर्च केले.
पूनावाला यांच्याकडे वैविध्यपूर्ण व्यवसाय पोर्टफोलिओ आहे. मनोरंजनाव्यतिरिक्त, त्यांचा व्यवसाय आर्थिक सेवा, रिअल इस्टेट आणि हॉस्पिटॅलिटी यासारख्या क्षेत्रात आहे. अदर पूनावाला हे कोविड लस तयार करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओदेखील आहेत.