खोटी स्वप्ने दाखवून मोदी सत्तेवर, राज्यात सत्ता बदल झाल्यास जनतेला दिलासा; कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे प्रतिपादन

दहा वर्षांपूर्वी गोरगरीब जनतेची दिशाभूल करून ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘सबका साथ-सब का विकास’ अशी खोटी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सत्तेवर आले. परंतु त्यांच्या एवढा खोटा पंतप्रधान देशात झाला नाही

Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

दहा वर्षांपूर्वी गोरगरीब जनतेची दिशाभूल करून ‘अच्छे दिन आयेंगे’, ‘सबका साथ-सब का विकास’ अशी खोटी स्वप्ने दाखवून नरेंद्र मोदी सत्तेवर आले. परंतु त्यांच्या एवढा खोटा पंतप्रधान देशात झाला नाही आणि भविष्यात होणारही नाही. मोदींची सत्ता गेल्यानंतरच देशात खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’ येतील, अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मोदी सरकार आणि भाजपवर हल्लाबोल केला.

पंढरपूर-मंगळवेढा आणि अक्कलकोट या दोन विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आले होते. मंगळवेढ्यात आयोजित सभेत त्यांनी भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांची उपस्थिती होती. सिद्धरामय्या म्हणाले, बाराव्या शतकात महात्मा बसवेश्वर हे मंगळवेढ्यात १५ वर्षे राज दरबारात मंत्री म्हणून काम करीत होते. त्यांनी समाजातील उपेक्षित, वंचित, दीन-दलितांसह सर्व घटकांना एकत्र आणून मानवतेची शिकवण देण्यासाठी लिंगायत धर्माची स्थापना केली. त्या दृष्टीने मंगळवेढ्याचे महत्त्व खूप मोठे आहे, याचा उल्लेख केला. काँग्रेसने महात्मा बसवेश्वरांच्या सर्व समावेशक विचारांनीच काम केले आहे. महात्मा बसवेश्वरांना अभिप्रेत असलेली राज्यघटना काँग्रेसनेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून देशाला दिली. संविधानानुसार सर्व समाज घटकांना सोबत घेऊन विकास करणारा एकमेव काँग्रेस पक्ष असल्याचा दावा सिद्धरामय्या यांनी केला.

बड्या भांडवलदारांच्या हितासाठी दहा वर्षात कारभार
सिद्धरामय्या म्हणाले, राज्यघटना मान्य नाही. केवळ उच्चवर्णीय आणि बड्या भांडवलदारांच्या हितासाठी भाजपने गेल्या दहा वर्षांत कारभार केला आहे. वेळोवेळी खोटी आश्वासने देऊन, जनतेची दिशाभूल करून, जातीधर्मात तेढ निर्माण करून सत्ता काबीज करणे हेच भाजपचे प्रमुख ध्येय राहिले आहे, असा आरोप सिद्धरामय्या यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात महायुती, महाविकास आघाडी, मनसे आणि अन्य पक्षांच्या सभा, मेळावे, रॅली काढून मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. या दरम्यान एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे, तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest