संग्रहित छायाचित्र
बार्शी नगरपालिकेत २२ वर्षे नगरसेवक असताना ज्ञात उत्पन्नापेक्षा जास्त म्हणजे ११ कोटी १२ लाख १३ हजार ८१६ रुपयांइतकी बेनामी संपत्ती जमवल्याप्रकरणी बार्शीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते नागेश अक्कलकोटे व त्यांच्या कुटुंबीयांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल झाला आहे.
बार्शी विधानसभा निवडणुकीतील शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप सोपल यांचे कट्टर समर्थक असलेले नागेश हरिभाऊ अक्कलकोटे (वय ४४, रा. खुरपे चाळ, बार्शी) व त्यांची पत्नी कल्पना अक्कलकोटे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बार्शी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केल्यामुळे बार्शीच्या राजकीय क्षेत्रात हा चर्चेचा विषय झाला आहे. नागेश अक्कलकोटे हे पूर्वी शिक्षक होते. १ जून २००१ पासून ३१ ऑगस्ट २०२२ अशी सुमारे २२ वर्षे ते बार्शी नगरपालिकेत नगरसेवक होते. नगरसेवक झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा सोडला होता.
नगरसेवक असतानाच्या कालावधीत अक्कलकोटे यांनी बेनामी मालमत्ता गोळा केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे प्राप्त झाली होती. त्यानुसार सुरुवातीला गोपनीय चौकशी आणि नंतर खुली चौकशी केली असता त्यात अक्कलकोटे कुटुंबीयांनी ज्ञात उत्पन्नापेक्षा १२२.७७ टक्के जास्त म्हणजे ११ कोटी १२ लाख १३ हजार ८१६ रुपये एवढी जास्त मालमत्ता बाळगल्याचे दिसून आले. ही मालमत्ता बेनामी असल्याचे ज्ञात असूनही त्यांची पत्नी कल्पना अक्कलकोटे यांनी त्यांना मदत केल्याचे लाचप्रतिबंधक विभागाने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर कार्यालयातील पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक हे या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.