संग्रहित छायाचित्र
भारतीय जनता पार्टीचे शिर्डी (जि. अहिल्यानगर) येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीच्या दिवशी, 12 जानेवारी 2025 रोजी प्रदेश अधिवेशन होणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित राहणार आहेत.
12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. याचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश भाजपाने एक मोठा उपक्रम हाती घेतला आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर आधारित हे अधिवेशन असेल. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांनुसार युवकांना प्रेरित करून भाजपाकडे आकर्षित करण्यासाठी या वेळी नवीन अभियानाची सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा या अधिवेशनात भव्य सत्कार केला जाणार आहे.
10 हजार कार्यकर्ते उपस्थित राहणार
शिर्डी येथील अधिवेशनासाठी राज्यभरातून सुमारे 10 हजार भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचेही बावनकुळे यांनी म्हटले आहे. तरुणाईशी संपर्क वाढविण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात येणार असल्याने हे अधिवेशन भाजपाच्या आगामी काळातील योजनांसाठी महत्त्वाचे असेल, असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.