दिवाळीमध्ये वीजसुरक्षेची काळजी घ्या - महावितरण

पुणे : दिवाळी सण साजरा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Desk User
  • Wed, 30 Oct 2024
  • 12:21 pm
Civic Mirror, सीविक मिरर, Pune Mirror, Pune Times Mirror, Pune, Pune News

संग्रहित छायाचित्र

पुणे : दिवाळी सण साजरा करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सणाच्या कालावधीत विद्युत सजावट, रोषणाई तसेच फटाक्यांची आतषबाजी करताना वीजसुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. सार्वजनिक वीजयंत्रणेसोबतच घरगुती रोषणाईच्या विद्युत उपकरणांपासून सतर्क राहावे. कोणत्याही प्रकारचा धोका न पत्करता वीजसुरक्षेची काळजी घेत दिवाळी सण साजरा करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

महावितरणची वीज यंत्रणा ही सार्वजनिक ठिकाणी आहे. यात उच्च व लघुदाबाच्या उपरी वीजवाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर आदी यंत्रणा उघड्यावर असल्याने फटाके फोडताना त्यापासून सुरक्षित अंतर ठेवावे. फटाक्यांच्या आतषबाजीत सार्वजनिक वीजयंत्रणेला आगीचा धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. रोहित्र, फ्यूज पेट्या, फिडर पिलर, रिंग मेन युनिटजवळ फटाके फोडू नयेत किंवा त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये अथवा तो जाळू नये. वीजवाहिन्यांना स्पर्श होईल किंवा धोका निर्माण होईल असे रॉकेटसारखे फटाके वाहिन्यांखाली उडवू नयेत. मोकळ्या जागेतच फटाके उडवावेत. वीजयंत्रणेला आग लागल्यास, धोका निर्माण झाल्यास, वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणच्या २४ तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ किंवा १९१२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

दिवाळी साजरी करताना घरगुती विद्युत उपकरणांपासून देखील सतर्क राहावे. घराच्या किंवा इमारतीच्या रोषणाईसाठी दिव्यांची विद्युत माळ चांगल्या दर्जाची असल्याची खात्री करून घ्यावी. विद्युत माळेचे वायर, दिवे, सॉकेट दर्जेदार नसल्यास धोका निर्माण होऊ शकतो. घर किंवा इमारतीचे अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करावी. घराबाहेर आकाशकंदील लावताना तुटलेल्या वायरचा वापर टाळावा किंवा तुटलेली वायर चांगल्या दर्जाच्या इन्सूलेशन टेपने सुरक्षित करून घ्यावी.

घरगुती उपकरणांसह विद्युत माळेपासून सुरक्षित अंतरावर तेलाच्या वातीचे दिवे लावावेत. विद्युत सॉकेटवर अधिकचा भर टाकू नये. आकाश कंदिल किंवा दिव्यांच्या विद्युत माळेसाठी थ्री पीनचा वापर न करता वायर्स थेट प्लगच्या छिद्रात आगपेटीच्या काड्यांच्या सहाय्याने खोचले जातात. त्यामुळे त्या प्लगमध्ये स्पार्कींग सुरु होऊन आग लागण्याची शक्यता असते. गॅलरीमधील लोखंडी जाळी किंवा घराचा लोखंडी जिना किंवा इतर कोणत्याही लोखंडी वस्तूपासून विद्युत दिव्यांची व आकाश कंदिलाची वायर दूर ठेवावी. ही वायर एकसंघ असावी. तुटलेली किंवा सेलोटेपने जोडलेली नाही याची खात्री करून घ्यावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest