संग्रहित छायाचित्र
आळंदी : इंद्रायणी नदीमध्ये तीर्थस्नानाचा करून हजारो वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेत गुरुवारी (ता. २८) माउलींचा संजीवन समाधीदिन साजरा केला. या तिथीला इंद्रायणीमध्ये स्नान करण्याला वारकरी संप्रदायामध्ये अनन्या साधारण असे महत्त्व आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीच्या दुतर्फा वारकऱ्यांनी अलोट गर्दी केली होती. माउली नामाच्या गजराने अवधी अलंकापुरी भक्तिभावाने आज न्हाऊन निघाली.
द्वादशीनिमित्त पंगतीला गोड मिष्टान्न आणि माउलींच्या चांदीच्या पादुकांवरील भाविकांचे अभिषेक सुरू होते. सुमारे नऊशे महापूजा आज माउलींच्या चलपादूकांवर पार पडल्या.
जो करील याची यात्रा। तो तारील सकळ गोत्रा ।।
सकळही कुळें पवित्रा । जयाचेनि दर्शने होतीं ।।
ही सद्भावना बाळगून राज्याच्या कानाकोपऱ्यातून पाच दिवस वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत. आज द्वादशी असल्याने कार्तिक वारीमध्ये इंद्रायणी स्नानाला अधिक महत्त्व आहे. पहाटे तीनपासूनच इंद्रायणी तीरावर स्नानासाठी भाविकांची अलोट गर्दी होती. दुपारी दोन वाजेपर्यंत नदीघाट वारकऱ्यांनी गजबजला होता. इंद्रायणीलाही मुबलक पाणी होते.
इंद्रायणी स्नानानंतर भाविक महापूजेच्या रांगेत उभा राहत होता. दर्शनाची रांग आजही इंद्रायणीतीरावरील दर्शन मंडपापर्यंत होती. स्वयंसेवी संस्थांचे स्वयंसेवक दर्शन मंडपातील भाविकांना चहा पाणी केळी वाटप करत होते. माउलींच्या चांदीच्या पादुकांना दुग्धाभिषेक झाल्यानंतर महाद्वारातून भाविक बाहेर पडत होते. त्यानंतर ठिकठिकाणी राहूट्यांमधून जेवणाच्या पंगती होत होत्या.
क्षीरापती घालितां वैष्णवां मुखी। तेणे मुखे देव होतसे सुखी ।। याप्रमाणे द्वादशीचे पारणे फेडण्यासाठी सकाळपासूनच फड आणि धर्मशाळांमधून जेवणाच्या पंगती सुरू होत्या. पिठलं भाकरीपासून गुलाबजाम, श्रीखंड, बालूशाही, जिलेबी अशा गोडधोड जेवणाबरोबरच खानदेशी दालबाटीच्या जेवणाचे बेत होता. ठिकठिकाणी राहूट्यांमधून अभंगाच्या स्वरात वारकरी जेवण करत होते.
द्वादशीचे जेवण उरकून इंद्रायणी स्नान, नगरप्रदक्षिणा आणि कळस दर्शन हा नित्यनेम पूर्ण करत काही वारकऱ्यांनी आज परतीचा मार्ग धरला. दुपारनंतर आळंदीतील भाविकांचा ओघ कमी झाला. मात्र बहुतांश वारकरी संजीवन समाधी सोहळ्यासाठी थांबले. त्यामुळे काकडा गाथा भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन जागर अशा कार्यक्रमात वारकरी आज दिवसभर दंग होते.
पहाटे माउलींच्या समाधीची शासकीय पंचोपचार पूजा प्रांताधिकारी अनिल दौंडे आणि तहसीलदार ज्योती देवरे यांच्या उपस्थितीत झाली. दुपारी चार ते सायंकाळी सहा हरिभाऊ बागडे यांचे वीणा मंडपात कीर्तन झाले. रात्री नऊ ते अकरा केंदूरकर महाराजांचे कीर्तन तर रात्री अकरा ते बारा देवस्थानच्यावतीने खिरापतपूजा, मानकऱ्यांना, दिंडीप्रमुखांना नारळप्रसाद वाटप केला.